कोरोनासह मुंबईला मलेरियाचा ‘ताप’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 02:35 AM2020-10-02T02:35:04+5:302020-10-02T02:35:43+5:30
सप्टेंबरमध्ये आढळले ६०० हून अधिक रुग्ण; लेप्टोचा एक बळी, डेंग्यू, गॅस्ट्रोचीही भीती
मुंबई : कोरोना प्रादुर्भावासह आता अन्य आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ६०० मलेरियाचे रुग्ण आढळून आले असून, लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे मागील वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत यंदा या आजारांच्या रुग्णांची संख्या कमी आहे.
एफ/एन विभागातील १६ वर्षीय मुलाचा ४ सप्टेंबर रोजी लेप्टोमुळे मृत्यू झाला. मुंबईत सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे ६६१, लेप्टोचे ५४, डेंग्यूचे १४, गॅस्ट्रोचे ९१, हेपेटायटिसचे १५ तर स्वाइन फ्लूचा १ रुग्ण आढळला. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे ७३२, लेप्टोचे ५६, डेंग्यूचे २३३, गॅस्ट्रोचे ४२५, हेपेटायटिसचे १०५ तर स्वाइन फ्लूचे ९ रुग्ण आढळून आले होते. तर लेप्टोमुळे तिघांचा मृत्यू झाला होता. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या सप्टेंबरमध्ये लेप्टोने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या घटली असली तरी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
सर्वेक्षणासह जनजागृतीवर भर
आरोग्य विभागाने लेप्टोस्पायरेसिसबाबत झोपडपट्टी व इतर ठिकाणी सर्वेक्षण केले. प्रौढांना डॉक्सीसाइक्लिन आणि प्रोफिलेक्सिझोफ गोळ्या देण्यात आल्या असून, लहान मुलांना व गर्भवती महिलांना अॅझिथ्रोमाइसिनच्या गोळ्या देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सोबतच पोस्टर, वृत्तपत्र जाहिराती, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे.
आजार सप्टेंबर २०१९ सप्टेंबर २०२०
रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू
मलेरिया ७३२ ० ६६१ ०
लेप्टो ५६ ३ ५४ १
डेंग्यू २३३ ० १४ ०
गॅस्ट्रो ४२५ ० ९१ ०
हेपेटायटिस १०५ ० १५ ०
स्वाइन फ्लू ९ ० १ ०