मलेरिया, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 05:37 AM2018-09-01T05:37:49+5:302018-09-01T05:38:54+5:30
आरोग्य विभागाची माहिती : मलेरियाचे ८०४, तर गॅस्ट्रोच्या ६४५ रुग्णांची नोंद
मुंबई : शहर-उपनगरात आॅगस्ट महिन्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. परंतु, या कालावधीत वातावरणीय बदलांमुळे आजारांचे प्रमाण मात्र वाढले आहे. आॅगस्ट महिन्यात साथीच्या आजारांचे एकूण सात बळी गेले असून, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ताप अंगावर काढू नये, वेळीच लक्षणे ओळखून वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.
आॅगस्ट महिन्यात मलेरियाचे तब्बल ८०४ रुग्ण आढळले आहेत. तर गॅस्ट्रोच्या ६४५ रुग्णांची नोंद पालिकेच्या आरोग्य खात्याकडे झाली आहे. त्याखालोखाल डेंग्यू आणि हेपेटायटिसच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. याखेरीज आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश आजाराचे २ हजार ३१७ रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ही संख्या २०१७ साली १ हजार ९३६ एवढी होती. आॅगस्ट महिन्यात डेंग्यूच्या बळीनंतर पालिका प्रशासनाने सी, एच/साऊथ आणि एफ/साऊथ विभागातील १ हजार १६९ घरांतील ६ हजार ७५२ व्यक्तींची तपासणी केली. यात सात जणांना ताप असल्याचे आढळले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर १ हजार ५४ घरांत धूरफवारणी करण्यात आली. या विभागातील ५६८ घरांच्या तपासणीत चार घरांत डासांच्या अळ्या आढळल्या, त्या नष्ट करण्यात आल्या. तर लेप्टोच्या बळीनंतर एम/ईस्ट वॉर्डमध्ये १ हजार १२० घरांतील ३ हजार ६६० लोकसंख्येची तपासणी करण्यात आली, त्यात तिघांना ताप दिसून आला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या परिसरात ७४ ठिकाणी उंदरांची बिळे आढळली, ती नष्ट करण्यात आली. तर मलेरियाच्या बळीनंतर एस/ईस्ट वॉर्डमध्ये ३ हजार ३८४ घरांतील १२ हजार १२५ लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. याशिवाय, ३८९ ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली.
आजार टाळण्यासाठी हे करा...
मच्छरदाणीचा वापर, घरांमध्ये करता येईल अशी कीटकनाशक फवारणी, परिसरात कीटकनाशक फवारणी, पाण्यामध्ये प्रतिबंधात्मक रसायने मिसळणे, कॉइल्स व मॅटसचा वापर, कीटकांची उत्पत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व जीवनशैली, जैविक तसेच पेशीय नियंत्रण उपाययोजना, कचरा व्यवस्थापन, घराची आरोग्यपूर्ण रचना, कीटकांपासून संरक्षण देणाऱ्या मलमांचा वापर, प्रवाशांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याद्वारे या आजारांपासून आपण संरक्षण करू शकतो.
ताप अंगावर काढू नका
पाऊस कमी झाला की, डासांच्या प्रजननाचे प्रमाण वाढते. पाऊस सतत पडत असला की, डासांच्या अळ्या वाहून जातात. मात्र साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाण अधिक वाढते. त्यातही विशेषत: एडीस जातीच्या डासाच्या प्रजननाचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे साथींच्या आजाराचे प्रमाण या महिन्यात वाढले आहे. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांची पैदास नष्ट करणे म्हणजे घरात किंवा परिसरात साचलेले पाणी ठेवू नये. त्याचप्रमाणे, ताप आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. जेणेकरून, औषधानंतर तो ताप कोणत्या प्रकारचा आहे, याचे निदान करणे व औषधोपचारांची प्रक्रिया अधिक सुलभ होते.
- डॉ. अभिजित शेणवी, फिजिशिअन.