मुंबईत आता मलेरियाचाही प्रादुर्भाव, महिन्याभरात हजारांहून अधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 02:57 AM2020-09-03T02:57:08+5:302020-09-03T02:57:50+5:30
मुंबईत गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात ८२४ मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली असून आॅगस्ट महिन्यात मलेरियाच्या रुग्णांनी हजाराचा टप्पा पार केला आहे.
मुंबई : मुंबईत कोरोनासोबत मलेरियाचेही रुग्ण वाढत असून आतापर्यंत मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ३१ आॅगस्टपर्यंत १ हजार १३७ मलेरिया रुग्णांची नोंद झाली असून, दोघांनी जीव गमावला आहे. २० जुलै नंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलैत मलेरियाचे रुग्ण दुपटीने वाढत आहेत.
मुंबईत गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात ८२४ मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली असून आॅगस्ट महिन्यात मलेरियाच्या रुग्णांनी हजाराचा टप्पा पार केला आहे. सध्या १ हजार १३७ रुग्ण मुंबईत सापडले आहेत. मलेरियाच्या खालोखाल लेप्टोच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये मुंबईत डेंग्यूचे ४९ रुग्ण सापडले होते. आॅगस्टमध्ये ४५ रुग्ण सापडले आहेत. लेप्टो रुग्णांची संख्या कमी असली तरी रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे, मलेरिया आणि लेप्टो डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह पेरिफेरल रुग्णालयांमध्ये पावसाळी आजारांसाठी दीड हजारांवर बेड्सची सोय करण्यात आली आहे. मलेरिया, डेंग्यूचे डास होऊ नयेत म्हणून पालिकेकडून फवारणी केली जात आहे.
स्वाइन फ्लूचा फक्त एक रुग्ण
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत स्वाइन फ्लूचा फक्त एकच रुग्ण आढळला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्वाइन फ्लूचे ३६ रुग्ण आढळले होते. मात्र, ही संख्या या महिन्यात फक्त एक आहे. गेस्ट्रोच्या रुग्णांमध्येही हळूहळू वाढ होत असून ५३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे, कोरोनापासून बचाव करता करता आता मुंबईकरांना पावसाळी आजारांपासून वाचवणे हेही आवाहन पालिकेसमोर आहे.