मुंबई : पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजारांनी मात्र अजूनही मुंबईकरांची पाठ सोडली नाही. २९ आॅगस्टच्या अतिवृष्टीनंतर अजूनही कचरा आणि पाण्याचा निचरा नीट न झाल्याने त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे शहर-उपनगरात मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे तब्बल २ हजार २१८ रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच, मुंबईत तासाला एकाला मलेरियाचा ‘डंख’ होत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.मलेरियाचे जुलै महिन्यात ७५२ रुग्ण, आॅगस्टमध्ये १ हजार ४८ रुग्ण आणि सप्टेंबरच्या १५ दिवसांत ४१८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरियाच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे. त्याचप्रमाणे, जानेवारी ते आॅगस्टमध्ये डेंग्यूचे २९३ रुग्ण आढळले असून सप्टेंबरच्या पंधरवड्यात १६४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत डेंग्यू, मलेरिया या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर जुलै महिन्यात मलेरियामुळे २ व आॅगस्टमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला. तर सप्टेंबरच्या पंधरवड्यात एकाही मृत्यूची नोंद नाही.या साथीच्या आजारांपासून बचावासाठी शक्य असल्यास मच्छरदाणी वापरावी. तसेच सांडपाण्याचा निचरा करणे तसेच पाणी साठू न देणे, डास चावू नये म्हणून अंगभर कपडे घालणे, पाणी जिरण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, बंद गटारे तयार करण्यावर भर देणे, जंतुनाशक फवारणी करून घेणे आदी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.>वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यामलेरिया या आजारात डासांच्या चाव्यामुळे येणारा ताप रात्री येण्याची शक्यता अधिक असून २० मिनिटे ते अर्धा तास थंडी वाजून एकदम ताप भरून येतो आणि काही तासांनी उतरतो. ताप आणि पाठोपाठ घाम असे सलग २-३ दिवस चालू राहते. डास चावल्यापासून सुमारे दोन ते तीन आठवड्यांनी ही लक्षणे दिसतात. त्यामुळे वेळीच ही लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
दरतासाला एकाला मलेरियाचा ‘डंख’, तीन महिन्यांत मलेरियाचे २ हजार २१८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 2:23 AM