लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गावरील सबवे गेल्या काही दिवसांपासून पावसात पूर्णपणे पाण्याने भरत असल्याने, स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती. सबवेच्या शेजारी गटार असून, ते तुंबलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सबवेच्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते, अशी तक्रार स्थानिकांनी केली होती. ‘लोकमत’ने स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेत, वृत्त प्रकाशित करताच स्थानिक लोकप्रतिनिधी कारवाईसाठी सरसावले. स्थानिक नगरसेविका दक्षा पटेल यांनी या प्रकरणी ‘लोकमत’ला सांगितले की, सबवे मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते. मार्गाचे रुंदीकरणदेखील करायचे आहे. सबवेच्या खाली गटार आहे, ते दुसऱ्या ठिकाणी वळविण्याचे काम शिल्लक आहे. त्याच मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून, त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते, परंतु रुंदीकरणाच्यामुळे मार्गाची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. रस्ता रुंदीकरणासाठी लागणारा निधी मिळाला की, काही दिवसांत काम सुरू होईल. सबवेपासून दफ्तरी रोडपर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात रस्त्यावर पाणी साचणार नाही.
मालाडचा सबवे दिलासा देणार; पाणी तुंबणार नाही
By admin | Published: June 26, 2017 1:50 AM