मलेशियातील झाडांसाठी 'मुंबई पॅटर्न'; केदाह राज्याच्या सुलतानांच्या मनात उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 12:58 AM2021-02-13T00:58:55+5:302021-02-13T07:04:35+5:30

केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहुम सुलतान बद्लीशाह हे मुंबई दौऱ्यावर असताना येथील वृक्षांच्या खोडांना तांबड्या व पांढऱ्या रंगाचे वैशिष्टपूर्ण लेपन असल्याचे पाहिले होते.

Malaysia to use mumbai pattern to conserve trees | मलेशियातील झाडांसाठी 'मुंबई पॅटर्न'; केदाह राज्याच्या सुलतानांच्या मनात उत्सुकता

मलेशियातील झाडांसाठी 'मुंबई पॅटर्न'; केदाह राज्याच्या सुलतानांच्या मनात उत्सुकता

Next

मुंबई : मुंबईतील झाडांना दिलेल्या रंगांनी मलेशियातील केदाह राज्याच्या सुलतानांच्या मनातही उत्सुकता जागवली. त्यानुसार मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत जैनल अजलान मोहम्मद नादजिर यांनी नुकतीच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी वृक्षांच्या खोडांना दिलेल्या तांबड्या व पांढऱ्या रंगाच्या वैशिष्टपूर्ण लेपनाचा अर्थ जाणून घेतला. आता मुंबईच्या धर्तीवर मलेशियातील झाडांना देखील गेरू व चुन्याचे लेपन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहुम सुलतान बद्लीशाह हे मुंबई दौऱ्यावर असताना येथील वृक्षांच्या खोडांना तांबड्या व पांढऱ्या रंगाचे वैशिष्टपूर्ण लेपन असल्याचे पाहिले होते. या मागचे शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी मलेशियात परत गेल्यानंतर वाणिज्यदूतांना यामागील कारणांची माहिती घेण्यास सांगितले. 

यासाठी झाडांच्या खोडांना लेपन
मुंबईसारख्या तुलनेने अधिक पावसाच्या परिसरात झाडांना बुरशी लागण्याची शक्यता असते. ती लागू नये, यासाठी आम्लीय गुणधर्म असणारा गेरू झाडाच्या खोडाच्या खालच्या बाजूला, तर त्यावर अल्कधर्मी गुणधर्म असणारा चुना लावला जातो.
सामान्यपणे बुरशी झाडाच्या खालच्या बाजूने लागण्यास सुरुवात होते व ती झाडाच्या वरील भागाकडे पसरत जाते. त्यामुळे बुरशीला प्रतिबंध करणारा गेरू व चुना हा झाडाच्या खालच्या बाजूला म्हणजेच खोडाला लावला जातो.

झाडाच्या खोडाला खोडकिडाचा प्रादुर्भाव झाल्यास त्या किड्यांद्वारे खोड पोखरले जाऊन झाड पडण्याचा व झाडाचा मृत्यू होण्याचा संभव असतो. यापासून संरक्षणासाठी लेपन केले जाते. तसेच यामुळे उन्हापासून संरक्षण होऊन भेगा पडण्याची शक्यता कमी होते.
गेरू व चुन्याचा रंग दिलेली झाडे ही सार्वजनिक संस्थेच्या मालकीची असल्याचे प्रतीकात्मक पद्धतीने अधोरेखित होते.

Web Title: Malaysia to use mumbai pattern to conserve trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.