म्युकरमायकोसिसचा पुरुष रुग्णांना अधिक धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:05 AM2021-05-24T04:05:47+5:302021-05-24T04:05:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महिला रुग्णांच्या तुलनेत पुरुष रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव अधिक आढळल्याचे दिसून आले आहे. देशभरातील चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला रुग्णांच्या तुलनेत पुरुष रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव अधिक आढळल्याचे दिसून आले आहे. देशभरातील चार वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या ‘म्युकरमायकोसिस इन कोविड-१९-अ सिस्टमेटिक रिव्ह्यू ऑफ केसेस रिपोर्टेड वर्ल्डवाइड इन इंडिया’ या अभ्यास अहवालातून हे समोर आले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या अभ्यासाकरिता देशभरातील १०१ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. १०१ रुग्णांच्या अहवालात ७९ पुरुष रुग्ण असल्याचे दिसून आले. त्यात १०१ पैकी ८३ रुग्णांच्या शरीरात साखरेची वाढलेली पातळी हा या आजारासाठी मोठा धोका ठरल्याचे निरीक्षण आढळून आले. हा अभ्यास अहवाल डॉ. अवदेश कुमार सिंग, डॉ. रितू सिंग, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. अनुप मिश्रा या तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या केला आहे. या अभ्यास अहवालात ८२ भारतीय रुग्ण आणि ९ अमेरिकेतील, तर तीन इराणमधील रुग्णांचा समावेश होता.
राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस या आजारामुळे ९० रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. १०१ रुग्णांपैकी ३१ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर १०१ रुग्णांपैकी ६० म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये कोरोनाचे संक्रमणही आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, ८३ रुग्णांना मधुमेह आणि ३ रुग्णांना कर्करोग असल्याचे दिसून आले.
‘रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे’
डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अहवालानुसार म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मधुमेह असल्यास मृत्यूचा अधिक धोका संभावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे, कोविड रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतही स्टेरोइड्सचा अतिवापर करणे टाळायला हवे.