मालेगाव २००८ बॉम्बस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:14 AM2021-01-08T04:14:04+5:302021-01-08T04:14:04+5:30
खटल्यास प्रज्ञासिंह ठाकूरची उपस्थिती मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्यास प्रज्ञासिंह ठाकूरची उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणी ...
खटल्यास प्रज्ञासिंह ठाकूरची उपस्थिती
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट
खटल्यास प्रज्ञासिंह ठाकूरची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने गेल्या महिन्यात न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिल्यानंतर भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर सोमवारी खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहिली. न्यायालयाने खटल्यावरील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली.
प्रज्ञासिंह ठाकूर हिला विशेष न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात बसविण्यात आले. १९ डिसेंबर २०२० रोजी विशेष न्यायालयाचे न्या. पी. आर. सित्रे यांनी ठाकूर हिला न्यायालयात उपस्थित राहण्याची अखेरची संधी दिली होती. ठाकूर गेल्या महिन्यात दोनदा खटल्याचा सुनावणीस अनुपस्थित राहिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.
सर्व आरोपी जामिनावर असल्याने त्यांनी आठवड्यातून एकदा तरी खटल्यास उपस्थित राहावे, असे आदेश २०१९ मध्ये विशेष न्यायालयाने दिले होते. सोमवारी ठाकूरसह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय आणि सुधाकर चतुर्वेदी न्यायालयात उपस्थित होते. अजय राहिरकर व सुधाकर द्विवेदी या वेळी अनुपस्थित होते.
उलट तपासणीसाठी एक साक्षीदार उपस्थित होता. मात्र, द्विवेदी याचे वकील न्यायालयात नसल्याने साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यात आली नाही. या खटल्याची सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांनी आरोपींना खटल्यास उपस्थित राहण्याचे दोनदा आदेश देऊनही ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे लॉकडाऊनंतर खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही. मार्चमध्ये या खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात आली. आतापर्यंत १४० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.
२९ सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले.