Join us

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : कर्नल पुरोहितांना उद्या एनआयए विशेष कोर्टात केले जाणार हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 9:29 PM

2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यांची आज सकाळी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली.

मुंबई, दि. 23 - 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहित यांची आज सकाळी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. कर्नल पुरोहित अजूनही लष्करात असल्यामुळे त्यांना सैन्याला रिपोर्टिंग करणे अपेक्षित असल्याने त्याबाबतची प्रक्रिया त्यांनी आज पूर्ण केली. त्यानंतर पुरोहित यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले.उद्या (गुरुवारी) पुरोहित यांना मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. त्यापूर्वी कर्नल पुरोहित यांच्या जिवाला धोका असल्यामुळे तळोजा कारागृहातून भारतीय लष्कराच्या वाहनातून त्यांना मुंबईला आणले. जिवाला धोका असल्यामुळे आज दिवसभर ते भारतीय लष्कराच्या निगराणीखाली होते. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नल पुरोहितला जामीन मंजूर केला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास पथक) न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळी उशिरा लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या सुटकेचा आदेश दिला. त्याची प्रत घेऊन पुरोहित हे पुन्हा तळोजा कारागृहात रवाना झाले.मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद श्रीकांत पुरोहित यांचा जामीन सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर करताच मंगळवारी त्यांना विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयात सर्व औपचारिकता पार पडल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या सुटकेचा आदेश दिला. गेली नऊ वर्षे पुरोहित हे तळोजा कारागृहातच आहेत.आदेशात बदल केल्याने लगेच सुटणे शक्य झालेले. कर्नल पुरोहित यांच्या वकिलाने सोमवारी न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या मूळ आदेशात मंगळवारी सकाळी तातडीने बदल करून घेतल्याने या आरोपीची तुरुंगातून लवकर सुटका होणे सुलभ झाले. कर्नल पुरोहित यांचा एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व तेवढ्याच रकमेचे दोन जामीन, अशा अटीवर सुटकेचा मूळ आदेश झाला होता.अ‍ॅड. नीला गोखले यांनी पुन्हा त्याच खंडपीठाकडे जाऊन या आदेशात बदल करून घेतला. त्यानुसार दोन जामिनांच्या ऐवजी प्रत्येकी एक लाखाचे दोन रोख जामीन, असा बदल केला गेला. परिणामी जामिनांची रोख रक्कम भरून कर्नल पुरोहित लगेच बाहेर येऊ शकले. रोख जामिनांच्या बदल्यात रीतसर जामीन देण्याची कायदेशीर प्रक्रिया पुढील १५ दिवसांत पूर्ण केली जाईल.

टॅग्स :न्यायालय