Join us

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: चार आरोपींना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:27 PM

दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर 29 जुलैला सुनावणी

मुंबई : 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील आरोपी लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले होते. या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भा. दं. वि. कलमांअंतर्गत बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा कट रचणे, तो अमलात आणणे, त्यामुळे निष्पापांचा खून करणे, त्यांना गंभीररीत्या जखमी करणे इत्यादी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे. या प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर 29 जुलैला सुनावणीमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी या आरोपींची दोषमुक्तीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर 29 जुलैला सुनावणी होणार आहे.  

काय आहे प्रकरण?मालेगावमध्ये 28 सप्टेंबर, 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 80 जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली होती. 

टॅग्स :मालेगाव बॉम्बस्फोटन्यायालय