Join us

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण: मेजर उपाध्याय यांना जामीन, उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 2:52 AM

सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यापाठोपाठ आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांचीही जामिनावर सुटका झाली.

मुंबई : सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यापाठोपाठ आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांचीही जामिनावर सुटका झाली. १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींचा जामीन मंजूर केल्याने आपलीही जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी विनंती मेजर रमेश उपाध्याय यांनी जामीन अर्जात केली आहे. परंतु, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) उपाध्याय यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. मात्र न्यायालयाने आपले हात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बांधले गेले आहेत, असे म्हणत एनआयएची विनंती मान्य करण्यास नकार दिला.या बॉम्बस्फोटात उपाध्याय यांची भूमिका पुरोहित यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाची होती का, अशी विचारणा न्या. रणजीत मोरे व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने या वेळी एनआयएकडे केली. एनआयएच्या म्हणण्यानुसार, उपाध्याय व पुरोहित यांच्यामधील फोनवरील संभाषण हा महत्त्वाचा पुरावा आहे. उपाध्याय यांनीही बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत हजेरी लावली होती. दरम्यान, ‘अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने पुरोहित यांचा जामीन अर्ज मंजूर केला. तर विशेष एनआयए न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच सुधाकर द्विवेदी व सुधाकर चतुर्वेदी यांची जामिनावर सुटका केली. त्यामुळे रमेश उपाध्याय यांचीही जामिनावर सुटका व्हायला हवी,’ असे उपाध्याय यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :न्यायालय