मुंबई : जगातील अनेक लोक भुकेने इतके व्याकूळ आहेत की, त्यांच्यासमोर देव भाकरीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही रूपात येऊच शकत नाही, असे महात्मा गांधीजींनी म्हटले होते. हे वाक्य आजच्या परिस्थितीतही लागू पडण्यासारखे आहे. परिणामी, केवळ शरीराच्या आजारपणाकडे लक्ष देऊ देऊन चालणार नाही, तर मनाच्या आजारपणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. समाजात वाढते एकारलेपण हाही एक मानसिक आजार असून, कुपोषण आणि दारिद्रय हे समाजातील मोठे आजार आहेत.एकात्मिक बाल विकास विभागाच्या एप्रिल २०१७ च्या आकडेवारीनुसार राज्यात सहा वर्षाखालील ६० लाख ७० हजार बालकांपैकी ७९,६१९ तीव्र कमी वजनाची बालके आहेत आणि मध्यम कमी वजनाची ५ लाख ५२ हजार ७४६ बालके आहेत.अशा परिस्थितीत शासनाने कुपोषण, बालमृत्यू याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. देशभरात अर्भक, बालक आणि मातांचे मृत्यू रोखण्यासाठीचे प्रयत्न फोल ठरत आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार भारतात २०१६ मध्ये सहा लाख बालमृत्यू झाले आहेत. जगातील बालमृत्यूंपैकी एक चतुर्थांश बालमृत्यू आपल्या देशात होत असून, यात अठ्ठावीस दिवसांखालील बालकांचे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.नवजात बालकांचा मृत्युदरही धोक्याच्या पातळीवर असून, तो २२.४ टक्के आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा, तर राज्यात गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूच्या प्रमाणात किंचितशी घट झाली आहे. २०१४ मध्ये २३ वरून ते २०१६ मध्ये २१ वर आले. एकट्या मुंबईतच २०१६-१७ या वर्षात एक हजार ४१४ बालमृत्यू झाले. नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये भारताचा जगात ३१वा क्रमांक लागतो. कुपोषित मुलांच्या प्रमाणात इथियोपिया, बांगलादेश, नेपाळ आणि पाकपेक्षाही भारतात वाईट स्थिती आहे.भारतातील वाईटाचे मूळ कारण जर कोणते असेल, तर ते म्हणजे सर्वसाधारण जनतेचे दारिद्र्य. भारताच्या अवनतीचे कारण लोकांची गरिबी हेच आहे. आजही भारतातील ४९ टक्के घरांमध्ये उत्तम शौचालय-बाथरूम नाहीत. कोट्यवधी लोकांना उघड्यावर शौचाला बसावे लागते. हीच वस्तुस्थिती अनारोग्याचे कारण असते. त्याचबरोबर, हाताची स्वच्छता नीट न राखणे हे दुसरे प्रमुख कारण आहे. कुपोषण ही जागतिक समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २००६ मध्ये जगात दर बारा व्यक्तींमागे एक व्यक्ती कुपोषित होती. साडेतीन कोटींपेक्षा जास्त मृत्यू कुपोषणामुळे किंवा त्यामुळे निर्माण होत असलेल्या रोगांमुळे होत होते. संयुक्त राष्ट्रांकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, २००१ मध्ये जगात सर्वाधिक कुपोषित व्यक्ती (२१ कोटी) भारतात होत्या. कुपोषणाचे महत्त्वाचे कारण म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्यामुळे खाण्याचे योग्य पदार्थ घेणे परवडत नाही. विशेषत: प्रथिने कमी पडतात. कमी खाणे, जास्त काम या चक्रात सापडून हळूहळू कुपोषणाचे दृश्य परिणाम दिसू लागतात.>‘राष्ट्रीय आरोग्य धोरण-२०१५ व आंतरराष्ट्रीय संदर्भ’ या विषयाचा विचार करावयाचा झाला, तर युरोप, उत्तर अमेरिका, आॅस्ट्रेलियामधल्या देशांचा कल्याणकारी खर्च हा २० ते ३० टक्के आहे. त्या तुलनेत भारतासह बहुसंख्य देश हा खर्च करीत नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी कालबद्ध दशसूत्री कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. यात आरोग्य क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा, स्वस्त व दर्जेदार रुग्णालयांचा विस्तार, सहभागी आरोग्यविमा विस्तार, प्राथमिक सेवांचा विस्तार, वैद्यकीय मनुष्यबळ, औषध-तंत्रज्ञान-आयुष आदींचा समावेश असणे महत्त्वाचे आहे.कोणत्या वयोगटांतील बालकांचा कुपोषणामध्ये समावेश करावा, याबाबतही अनेक मतप्रवाह आहेत. या समस्येला आळा घालण्यासाठी अद्यापही कोणतीही दिशा स्पष्ट होत नाही. एकात्मिक बालविकास योजनेत त्रुटी आहेत. कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रामुख्याने अंगणवाड्यांचा वापर केला जातो, परंतु कुपोषण सहा ते २४ महिन्यांच्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून नऊ ते २४ महिन्यांच्या मुलांवर लक्ष केंद्रित केले आहे. या वयोगटांतील मुले अंगणवाडी येतच नाहीत, हे वास्तव आहे. वेगवेगळी पोषक अहाराची पाकिटे दिली, तरी कुपोषणाचा प्रश्न सुटणार नाही. बालकांची पचनशक्ती कमी असेल, अतिसारासारखे आजार असतील, तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. पचनशक्ती सुधारेपर्यंत आरोग्य विभागाने कुपोषित बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे.महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, तरी आरोग्य व आरोग्यसेवा याबाबत महाराष्ट्र पिछाडीवर राहिले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागत असला, तरी आरोग्य सेवेच्या निर्देशांकामध्ये महाराष्ट्र मागे आहे. सार्वजनिक सेवांचा ºहास झाल्यामुळे गरिबांनाही खासगी सेवेवर अधिकाधिक अवलंबून राहावे लागत आहे. आरोग्यावरील सरकारी खर्चात व सरकारी सेवेत वाढ, पुरेसे व सक्षम मनुष्यबळ विकसित करणे, औषधांची खरेदी व आरोग्य केंद्रांना पुरवठा होणे, ग्रामीण उपकेंद्रांच्या दर्जात वाढ, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य अधिकाºयांची नेमणूक करणे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये यांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे.संतुलित आहार मिळूनही मुले कुपोषित होत असल्याने महिला व बालकल्याण विभागाबरोबर आरोग्य विभागाने काम करण्याची गरज आहे. अतिसार, श्वसनदाह व अन्य आजाराने कुपोषण होते. मात्र, कुपोषणाची संकल्पना स्पष्ट नसल्याचेही सत्य पुढे येत आहे.
अस्वच्छतेनेहीे होऊ शकते कुपोषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 6:15 AM