राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:30 AM2019-08-06T02:30:08+5:302019-08-06T02:30:23+5:30
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विरोध मावळल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी पक्षाचे प्रवक्ते नवाब ...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विरोध मावळल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मलिक यांची नियुक्ती करावी असे आदेश पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिले होते. मात्र मलिक यांना अध्यक्ष केले तर आणखी काही लोक पक्ष सोडून जातील असे कारण सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोध केला; कारण त्यांचा आग्रह संजय दिना पाटील यांच्यासाठी होता अशी चर्चा होती. मलिक हे अजित पवार यांच्या जवळेच म्हणून ओळखले जातात. महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या जागी तात्काळ रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली. मलिक उद्या आपल्या पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत.
नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी अशोक गावडे, जिल्हा निरीक्षकपदी प्रशांत पाटील यांची नियुक्ती केली आहे. गावडे हे गणेश नाईक यांच्या विरोधी गटातले मानले जातात. नाईक यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपत प्रवेश केला आहे. अद्याप गणेश नाईक यांनी आपले पत्ते उघडलेले नाहीत.