मुंबई महापालिकेला मलिष्काने पुन्हा एकदा गाण्यातून दाखविले रस्त्यावरचे खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 01:20 AM2019-09-20T01:20:27+5:302019-09-20T01:20:37+5:30
रस्त्यावरच्या खड्ड्यांप्रकरणी मुंबई महापालिकेवर गाण्यांच्या माध्यमातून टीका करणाऱ्या आरजे मलिष्काने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे.
मुंबई : रस्त्यावरच्या खड्ड्यांप्रकरणी मुंबई महापालिकेवर गाण्यांच्या माध्यमातून टीका करणाऱ्या आरजे मलिष्काने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. या वेळीही मलिष्काने खड्ड्यांप्रकरणीच महापालिकेवर गाण्याच्या माध्यमातून उपहासात्मक टीका केली आहे. मलिष्काने आता ‘चांद जमीन पर’ या टायटलने नवे गाणे प्रदर्शित केले असून, हे गाणे सोशल साइटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मुंबई महापालिका आणि आरजे मलिष्का यांचे नाते तसे जुनेच. मलिष्का चर्चेत आली ती ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का?’ या गाण्यामुळे. हे एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि मलिष्का आणि महापालिकेमध्ये जुंपली. मलिष्काने महापालिकेला रस्त्यावरचे खड्डे दाखविले आणि महापालिकेला मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या; आणि बघता बघता ‘महापालिका विरुद्ध मलिष्का’ असे समीकरणच बनले. आता काही दिवसांचा अवधी वगळता पुन्हा एकदा रस्त्यावरच्या खड्ड्यांवरून मलिष्काने महापालिकेला फैलावर घेतले. तिने आता ‘चांद जमीन पर’ या टायटलने नवे गाणे प्रदर्शित केले आहे. आपण चंद्रावर पोहोचलो नाही म्हणून काय झाले? चंद्र थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे, असे म्हणत मलिष्काने मुंबईतील खड्ड्यांची समस्या मांडली आहे. पावसाने मुंबईची होणारी तुंबई, होणारे हाल तिने गाण्यातून मांडले आहेत. तिने हे गाणे आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केले आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यास मोठ्या प्रमाणात लाइक मिळत असून ते शेअरही करण्यात येत आहे.
>मलिष्का खड्ड्यांसाठी चक्क रस्त्यावर उतरली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत तिने हे गाणे चित्रित केले आहे. यामध्ये ती नववधूच्या वेशात दिसत आहे. तिच्या हातात चाळणी आहे. चाळणीतून ती खड्ड्यांना आणि चंद्राला पाहताना दिसत आहे.