मुंबई : जळगाव येथील जैन फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या २०१४-१५ या द्विवार्षिक पुरस्कारासाठी ‘बहिणाई पुरस्कार’ मलिका अमर शेख यांना जाहीर करण्यात आला आहे. तर बालकवी ठोंबरे पुरस्कारासाठी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांची सर्वोत्कृष़्ठ कवी म्हणून तर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली आहे. भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फांउडेशन आणि बहिणाबाई मेमोरिअल ट्रस्टच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा रविवारी ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केली. सन्मानचिन्ह, गौरवपत्र, एकावन्न हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ६ सप्टेंबर २०१५ रोजी जळगाव येथील जैन हिल्स स्थित, गांधीतीर्थ सभागृहात होणार आहे. महाराष्ट्रातील वाङ्मयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. डॉ. नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने ही निवड केली. या बैठकीस राजन गवस, प्रभा गणोरकर, संजय जोशी, बाबा भांड, शंभू पाटील हे सदस्य उपस्थित होते. या पुरस्कारांसाठी प्रथितयश समीक्षक, साहित्यिकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. समीक्षकांकडून शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते.समाजातील विविध विषयांचा सखोल अभ्यास आणि सूक्ष्म निरीक्षणातून दृष्टीपथास आलेल्या वास्तवाचे दर्शन लेख आपल्या लेखणीतून समाजाला घडवित असतात. साहित्य क्षेत्राला अधिकाधिक प्रेरणा, बळकटी व व्याप्त स्वरुप प्राप्त व्हावे, हे या साहित्य पुरस्काराचे प्रयोजन असल्याचे डॉ.नेमाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मलिका अमर शेख यांना पुरस्कार
By admin | Published: July 20, 2015 1:32 AM