मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. अद्यापही मंदिरे सुरु करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आलं होतं. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी या पुजाऱ्यांनी भेट घेतली.
या भेटीत राज्यातील मंदिरे सुरु करावीत अशी मागणी पुजाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केली. यावेळी राज ठाकरेंनी कशाप्रकारे तुम्ही मंदिरे सुरु करणार, याची नियमावली आखा. मंदिरात झुंबड झाली तर काय करणार? याची नियमावली तयार करा, ही नियमावली राज्य सरकारकडे सुपूर्द करु अशी सूचना राज यांनी पुजाऱ्यांना दिली. मंदिरे खुली केली जावीत असे आपलेही मत आहे. पण इतर धर्मीयांचे काय? ते सर्व नियम पाळतील का? अशी शंकाही राज यांनी बैठकीत उपस्थित केली.
त्याचसोबत मॉल उघडली असतील तर मंदिरे का नाही? असा सवालही राज्य सरकारला केला आहे. नियमावली आली तर ती सर्वांसाठी असेल. मंदिरे उघडलीच पाहिजेत अशी मनसेची भूमिका आहे. पण लोकांची झुंबड आली तर ती कशी नियंत्रणात आणणार? हा प्रश्न आहे. मंदिरे खुली झाली आणि गर्दी झाली तर नियोजन कसं करणार? धार्मिक स्थळं उघडली तर ती फक्त मंदिरासाठी नसेल तर इतर धार्मिक स्थळांसाठीही असेल. आपण नियम पाळले पण इतरांनी नाही पाळले तर काय करणार? राज्य सरकारने याबाबत नियमावली तयार करायला हवी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडली. (Raj Thackeray)
त्र्यंबकेश्वर मंदिरासंदर्भात आम्ही राज ठाकरेंची भेट झाली, येत्या २ दिवसांत याबाबत काय नियमावली सरकार काढणार आहे का? हे पाहावं लागेल. मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात झुंबड केली तर ती नियंत्रणात कशी आणणार? हा प्रश्न त्र्यंबकेश्वरपुरता मर्यादित नाही तर सर्वच मंदिरासाठी आहे. त्यामुळे पुढील नियोजन, नियमावली तयार करावी असं या बैठकीत झालं. मंदिर खुली करण्याबाबत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे असं पुजाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत म्हटलं होतं की, मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. कारण, त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. तसेच, लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळे याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित पवार यांनी म्हटलं होतं.