Join us

Man Vs Wild कार्यक्रमातील मोदींच्या 'त्या' विधानाचा उल्लेख करत काँग्रेसचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 6:56 PM

सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली

मुंबई - भाजपा शिवसेना सरकारच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ अन् पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार आहे. असे प्रतिपादन काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या काँग्रेसच्या अद्यावत वॉर रूमचे उद्घाटन  रविवारी खर्गे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना खर्गे म्हणाले की, अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली अद्यावत वॉर रूमच्या माध्यमातून विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचे नियोजन आणि समन्वय साधला जाणार आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून स्टार प्रचारकांच्या सभांचा समन्वय, सोशल मिडीयावरील प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे. उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत व सल्ला दिला जाणार आहे.

पत्रकारांनी आरेमधील वृक्षतोडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की,  सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली. याला विरोध करणा-या मुंबईकरांना, तरूण विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबले आहे. डिस्कव्हरी चॅनलच्या मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये मोदीजींनी आपल्या काकांना लाकडाचा व्यवसाय करायचा होता पण आजीने वृक्षामध्ये जीव असतो लाकडाचा व्यवसाय करू नको, असे सांगितले होते. याची आठवण करून देत आपण पर्यावरणाबाबत किती संवेदनशील आहोत हे पंतप्रधानांनी त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि अटक केलेल्या तरूण आणि विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. 

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी काँग्रेसची वॉर रूम सज्ज आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची भूमिका मतदारापर्यंत पोहचणे आणि प्रचाराचे समन्वय साधण्याचे काम केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. राज्यभरात स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. वॉर रूमच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक जोरदार पद्धतीने प्रचार अभियान राबवेल असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :काँग्रेसनरेंद्र मोदीआरेसोशल मीडियामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019