मॉल, सिनेमा, बाजारात मुलं गेलेली चालतात, मग ती शाळेत गेली तर धोका कसा होतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 06:04 AM2021-12-25T06:04:07+5:302021-12-25T06:05:03+5:30
एका पिढीची दोन वर्षे वाया घालवतोय, याचे भान शाळांविषयीचे तुघलकी निर्णय घेणाऱ्यांना आहेत का? असा सवाल मुंबईतल्या संतप्त पालकांनी केला आहे.
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मॉल चालू आहेत. राजकीय पक्षांचे सगळे कार्यक्रम भरपूर गर्दीसह पार पडत आहेत. बाजारातल्या गर्दीला कसलेही नियम नाहीत. राजकीय नेते बिनधास्त विनामास्क फिरताना दिसतात. सिनेमा, नाटकंदेखील सुरु झाली. मात्र शाळेत शिकणाऱ्या मुलांनी असा काय गुन्हा केला की त्यांनाच शाळेपासून दूर ठेवले जातेय... यामुळे आपण एका पिढीची दोन वर्षे वाया घालवतोय.. याचे भान शाळांविषयीचे तुघलकी निर्णय घेणाऱ्यांना आहेत का? असा सवाल मुंबईतल्या संतप्त पालकांनी केला आहे.
मुंबईत शाळा सुरू करण्याला परवानगी आहे, तरीही अनेक खासगी शाळांनी अद्यापही शाळांचे टाळे उघडलेले नाही. नवीन वर्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय पालकांवर लादला गेला. या निर्णयामुळे संतप्त पालकांच्या ‘पॅरेंटस असोसिएशन मुंबई’ या संघटनेच्या सदस्यांनी ‘लोकमत’चे कार्यालय गाठले.
शिक्षण विभाग आणि शासनाकडून मुजोर शाळांवर कारवाई का होत नाही, अशी त्यांची मागणी आहे. शाळा बंद असल्याचा मोठा परिणाम मुलांच्या सामाजिक, भावनिक, शैक्षणिक आयुष्यावर झाला असून अवघी मुंबई चालू असताना केवळ शाळा पूर्ण क्षमतेने, पूर्ण वेळ चालविण्यावर बंदी का? असा त्यांचा सवाल आहे. शिवाय मुंबईतील सरसकट सर्व माध्यमाच्या, इयत्ताच्या शाळा पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण वेळ सुरु कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबईच्या शाळांतील नर्सरी ते बारावीपर्यंतचे वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू करावेत, या मागणीसाठी मुंबईकर पालकांच्या पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई २०२१ या पालक संघटनेने ऑनलाईन याचिका स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यात ६ हजारहून अधिक पालकांनी आपला सहभाग नोंदविला.
पालकांची सोशल जनजागृती मोहीम
इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम अशा सोशल माध्यमावर या पालकांचा मोठा ग्रुप कार्यान्वित असून त्यामध्ये सीबीएसई, आयसीएसई, आयबी, राज्य मंडळ अशा सर्व मंडळाच्या मुंबई विभागांतील १०० हून अधिक शाळांतील पालकांचा यात सहभाग आहे.
२ वर्षांपासून मुलं संगणकाच्या स्क्रीनशी बोलत शिक्षण घेत आहेत. ऑनलाईन गेम्स, इतर चॅनेल्स हे त्यांच्या एका क्लिकवर असल्याने अभ्यासाशी असलेली त्यांची नाळ कमकुवत झाली आहे. ऑनलाईन शिक्षण प्रत्यक्ष शिक्षणाची जागा कधीच घेऊ शकत नाही. अनेक तज्ज्ञ शाळा सुरू करण्याचा सल्ला देत असूनही शाळा पूर्णपणे उघडण्याचा निर्णय घेतला न जाणे हे दुर्दैवी आहे. - पूजा पसरिचा
मुलांचा घरात बसून कोंडमारा झाला असून ते शाळेत जाण्यास उत्सुक आहेत. त्यांना शाळा का सुरू नाहीत याची कारणे देऊन आम्ही पालक कंटाळलो आहोत. मुलाला ३ ते ४ तास सतत ऑनलाईन अभ्यास करायला लावणे ही पालकत्वाच्या विरोधातील गोष्ट आहे. शिक्षण ही प्राथमिकता म्हणून समोर ठेवून शाळा सुरू करणे ही काळाची गरज आहे. - अरुंधती डे – शेठ
जी मुलं शाळेत जात नाहीत ती मुलं मॉल, हॉटेल्स, ट्रेन्स, चित्रपट, खेळाची मैदाने या सगळ्या जागांवर ये जा करीत आहेत. मग ती शाळांमध्ये का जाऊ शकत नाहीत? उलट इतर सार्वजनिक ठिकाणांहून शाळा अधिक सुरक्षित आहेत. विद्यार्थी आणि त्यांचे शैक्षणिक भविष्य ही प्राथमिकता ठेवून निर्णय घेतले नाहीत तर या मुलांचे भवितव्य धोक्यात येईल. - आदिती सरदेशपांडे
शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी अशक्य गोष्ट आहे. खेळ, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याशिवाय शिक्षण अर्धवट आहे. शिक्षण विभाग आणि शासनाने ठरविण्यापेक्षा शाळा आणि पालकांना एकत्रित बसून शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याचा निर्णय घेणे जास्त योग्य ठरणार आहे. - हमसीनी रवी