Join us

मॉल्सचे गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ४० हजार कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी काम करत असलो तरीदेखील आता कुठे कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी काम करत असलो तरीदेखील आता कुठे कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मात्र या काळात मुंबईसह राज्यभरातील ७५ मॉल तब्बल नऊ महिने बंद होते. या नऊ महिन्यांच्या काळात मॉलला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले असून, एका महिन्याचे नुकसान चार हजार कोटी पकडले तर नऊ महिन्यांत तब्बल ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात पाच हजार कोटी जीएसटीदेखील समावेश आहे.

शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश कुमार यांनी सांगितले की, सरकारने मॉल खुले करण्यासाठी केव्हाच परवानगी दिली आहे. मात्र नियम आणि अटी अशा लागू केल्या आहेत की मॉल खुले करता येत नाहीत. सरकार म्हणते, सगळ्या कर्मचाऱ्यांना लसीच्या दोन मात्रा बंधनकारक आहेत. आमचे सगळे कर्मचारी १८ ते ४४ या वयोगटातील आहेत. मुळात या वयोगटासाठी लसीकरणाचा कार्यक्रम विलंबाने सुरू करण्यात आला. आता लसीच्या दोन मात्रांमधील अंतर आणि दोन डोस पूर्ण झाल्यानंतर आणि १४ दिवस; अशा अटीमुळे आमचे जेमतेम १० ते १२ टक्के कर्मचारी मॉलमध्ये प्रवेश करू शकतात. आता ज्या कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. आणि त्यानंतरचे १४ दिवस गृहीत धरले तर मॉल खुले होण्यास सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडेल.

.......

कर माफीसाठी पावले उचलावीत

आमच्या सरकार सोबत ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये आम्ही एकच मुद्दा मांडला, तो म्हणजे ज्या कर्मचारी वर्गाचा एक डोस झाला आहे त्या कर्मचारीवर्गाला काम करण्याची परवानगी मिळावी. दुसरे म्हणजे ग्राहकांसाठीही हाच नियम लागू करावा. तसेच आमचे मोठे नुकसान झाले असून, मॉल बंद असलेल्या काळात लागू झालेले सगळे कर माफ करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणीदेखील जोर धरू लागली असल्याचे मुकेश कुमार यांनी सांगितले.

........

७५ मॉल इतके मुंबईसह महाराष्ट्रात आहेत

दोन लाख कर्मचारी हे मॉलमध्ये प्रत्यक्ष काम करत आहेत, तर मॉलशी निगडित अशा अप्रत्यक्ष कर्मचारी वर्गाची संख्या दोन लाख आहे. म्हणजे एकूण कर्मचारी वर्गाची संख्या चार लाख आहे. १५ टक्के इतक्याच मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.