'... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 11:22 AM2020-01-18T11:22:55+5:302020-01-18T11:41:12+5:30
नाइटलाइफला भाजपाच्या आशिष शेलार यांनी विरोध केला आहे.
मुंबई : महानगरी मुंबईत नाइटलाइफ सुरू व्हावे म्हणून गेली काही वर्षे आग्रही असणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा केली. नाइटलाइफवरून भाजपाच्या आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नाइटलाइफच्या निमित्ताने निवासी भागात 24 तास हॉटेल सुरू ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असाल; तर त्याला आम्ही कडाडून विरोध करू अशा शब्दांत शेलार यांनी विरोध दर्शवला आहे.
'नाइटलाइफ संदर्भातील नियमावली अद्याप प्रसिद्ध व्हायची आहे. ती जाहीर झाल्यावर त्याबाबत सविस्तर भाष्य करू. कायदा आणि सुव्यवस्थेसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार व्हायला हवा. या निर्णयामुळे पोलिसांवर ताण येणार असून, अनेक नवे प्रश्न निर्माण होतील' असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात. निवासी भागात हॉटेल,पब सुरू ठेवण्यास आमचा विरोधच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
व्यापार वाढीसाठी 24×7 माँल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे..पण त्याच गोंडस नावने रात्रभर बार,लेडिजबार,पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात,पोलिसांवर ताण.. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात. निवासी भागात हाँटेल,पब सुरु ठेवण्यास आमचा विरोधच!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 18, 2020
आशिष शेलार यांनी शनिवारी (18 जानेवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. 'व्यापार वाढीसाठी 24×7 मॉल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे... पण त्याच गोंडस नावाने रात्रभर बार, लेडिजबार, पब सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात. निवासी भागात हॉटेल,पब सुरू ठेवण्यास आमचा विरोधच!' असं ट्विटमध्ये शेलार यांनी म्हटलं आहे.
26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू होणार...भाजपाकडून विरोध सुरूhttps://t.co/AJ3bWemMvj@AUThackeray@ShivSena@ShelarAshish@BJP4Maharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) January 17, 2020
मुंबईमध्ये नाइटलाइफसाठी आग्रही असलेले आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.मुंबई महापालिकेमार्फत आयोजित ‘स्वच्छता सर्वेक्षण 2020’ या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अनिवासी क्षेत्रात सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले. मुंबईआधी अहमदाबाद शहरात नाइटलाइफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे राहावे असे वाटतेय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जगभरातील अनेक महानगरांत नाइटलाइफची व्यवस्था आहे. तशी मुंबईतही हवी, असा विचार मांडत आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी आग्रह धरला होता. वर्षभरापूर्वी सरकारने याबाबत अधिसूचना काढली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे उपस्थित करीत या उपक्रमाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. आता मात्र प्रजासत्ताक दिनापासून त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'
निर्भयाच्या आईनं दोषींना माफ करावं, ज्येष्ठ वकिलाचा अजब सल्ला
'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'
मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका
‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली