मुंबई : नऊ हजार कोटींचा बँक घोटाळा करणारा किंगफिशर एअरलाइन्सचा अध्यक्ष विजय मल्ल्याला देशात परत आणण्यासाठी तपासयंत्रणा अनेक मार्ग काढत आहे, तरीही मल्ल्या त्याला दाद देत नाही. एवढेच नाही, तर त्याने न्यायालयाच्या आदेशांनाही जुमानले नाही. अखेरीस गुरुवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्ट) न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मल्ल्याची देशातील जंगम मालमत्ता, तसेच शेअर्स जप्त करण्याची परवानगी दिली. न्यायालयाच्या परवानगीमुळे ईडीचा मल्ल्याची देशातील कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष पीएलएमए न्यायालयाने या पूर्वी मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतरही तो न्यायालयात हजर न राहिल्याने विशेष न्यायालयाने त्याला ‘प्रोक्लेम आॅफेन्डर’ म्हणून जाहीर करत, त्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला. तरीही मल्ल्या न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे ईडीने मल्ल्याला फरारी म्हणून जाहीर करण्यात यावे व त्याची देशातील आणि परदेशातील जंगम मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी आॅक्टोबरमध्ये विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. जप्तीचे आदेश देण्यापूर्वी सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने ईडीला दिला. (प्रतिनिधी)
मल्ल्याच्या जंगम मालमत्तेवर येणार टाच
By admin | Published: November 11, 2016 5:44 AM