मालवण प्रकरण: मविआ आक्रमक; "आंदोलनाला परवानगी देत नसाल तर...'; संजय राऊत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 11:02 AM2024-09-01T11:02:27+5:302024-09-01T11:03:45+5:30
"पोलिसींनी जरी परवानगी नाकारली असली तरी 11 वाजता शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि आम्ही हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचू आणि आमचे आंदोलन सुरू होईल."
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. यामुद्यावरून राज्यातील राजकारणही पेटले आहे. याच मुद्यावर सरकारचा निषेध करण्यासाठी आज (रविवार) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी सरकारला 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे. यासंदर्भात बोलताना, "पोलिसींनी जरी परवानगी नाकारली असली तरी 11 वाजता शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि आम्ही हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचू आणि आमचे आंदोलन सुरू होईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन ठिकठिकाणी सातत्याने सुरू राहील," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले राऊत -
राउत म्हणाले, "आज केवळ तुमचा (सरकारचा) निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनांना परवानगी द्यावीच लागते. जर तुम्ही ती देणार नसाल, तर ही तुमची दडपशाही आहे झुंड शाही आहे. खरं म्हणजे आज रविवार आहे. ज्या भागात हे आंदोलन होत आहे तो संपूर्ण भाग आज बंद आहे. तरीही तुम्ही आंदोलनाला परवानगी देत नसाल, तर तुमच्या मनात हुकूमशाहीची एक वृत्ती आहे. ती वाढली आहे."
शिवाजी महाराजांचा काळ असता तर... -
राऊत म्हणाले, "आम्ही केवळ जोडे मारो आंदोलन करतोय. शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता. मी अत्ता बघितलं, आता आम्ही आंदोलन करत आहोत म्हणून हे भाजपचे लोकही आंदोलन करत आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करत आहोत आणि हे आमच्या विरोधात आंदोलन करत आहेत. यांची डोकी फिरलेली आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान झाला. शिवाजी महाराजांचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी आम्ही आंदोलन करतोय आणि भाजपचे लोक आमच्या विरोधात आंदोलन करत आहेत, हे यांचे शिवप्रेम."