मालवणी दुर्घटना, इमारत बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 07:32 PM2021-06-11T19:32:57+5:302021-06-11T19:34:06+5:30
रमझान शेख असं या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचं नाव असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच, इमारतीचा मालक रफिक सिद्दिकी यासही ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. याप्रकरणी आता इमारतीचे मालक आणि इमारत बांधणाऱ्या कॉन्टॅक्टरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
रमझान शेख असं या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचं नाव असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच, इमारतीचा मालक रफिक सिद्दिकी यासही ताब्यात घेण्यात आले आहे. ठेकेदार रमझान शेख यांस अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केले असता 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मालवणी इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच, इमारतही खबरदारी म्हणून रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात आले आहे.
#UPDATE | Ramzan Sheikh, the contractor who constructed the building in Malvani which collapsed on Wednesday night killing at least 11 people, has been sent to Police custody till 16th June.#Mumbai
— ANI (@ANI) June 11, 2021
मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.
शेजारील धोकादायक इमारतही रिकामी केली
दुर्घटना घडली तिथे जवळच एक तळ अधिक तीन मजल्यांची धोकादायक स्थितीतील इमारत असून त्यात काही कुटुंबांचे वास्तव्य आहे. खबरदारी म्हणून ही पूर्ण इमारत रिकामी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र हलवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही सर्व बांधकामे कलेक्टर लँडवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इमारत कोसळली. बचावकार्य सुरू आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अन्य कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तर मुंबईत बुधवारीपासून मान्सूनचे आगमन झाले. पावसाच्या तडाख्यात मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. उपनगरात पावसाचा जोर अधिक होता.