सिंधुदुर्ग - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी पावणेबारा वाजता सुटणारे अलायन्स एअर कंपनीचे विमान अचानक रद्द केल्याने विमानात बसलेल्या ५१ प्रवाशांनी विमान कंपनीला चांगलाच मालवणी दणका दिला. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत विमानातून न उतरण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ पासून रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल नऊ तास प्रवासी या विमानातच बसून होते. रात्री उशिरा या प्रवाशांची राहण्या-खाण्याची व्यवस्था करून उद्या त्यांना चिपीत आणले जाणार आहे. प्रवाशांनी दाखविलेल्या धैर्याचे मालवणी मुलखात, सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत होते.
दरम्यान, हे विमान पहिले रद्द केले. त्यानंतर प्रवाशांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर एक खासगी विमान मुंबई विमानतळावर कोसळल्यानंतर अनेक विमानांची उड्डाणे रद्द केली. त्यात हे विमानही रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र, आतील प्रवाशांनी विमानातून हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पहिला एसी बंद करून, त्यानंतर लाइट बंद करून प्रवाशांना आतून बाहेर काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, प्रवासी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सायंकाळी उशिरा हे विमान सोडले तर चिपी येथे नाइट लँडिंगची व्यवस्था नसल्याचे कारणही कंपनीकडून सांगण्यात आले.