राणे पिता-पुत्रांना पोलिसांचे समन्स; दिशा सालियन प्रकरणी तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:55 AM2022-03-03T05:55:05+5:302022-03-03T05:55:48+5:30
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत चुकीचे विधान करत बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसांनी समन्स बजावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूबाबत चुकीचे विधान करत बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसांनी समन्स बजावले आहे. यामध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजता नितेश राणे यांना हजर राहण्यास सांगितले आहे. तर, नारायण राणे यांना शुक्रवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
दिशाची आई वसंती सालियन (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल - मे २०२० दरम्यान दोन डील्स रद्द होऊन झालेल्या तोट्यामुळे दिशा निराश होती. तसेच तिला वेळोवेळी याबाबत समजावले होते. त्यानंतर जाहिरातीच्या शूटिंगच्या कामानिमित्त ४ जून रोजी मित्र रोहनसोबत त्याच्या मालाड येथील निवासस्थानी गेले.
तेथेच, ८ जून रोजी मित्र इंद्रनीलचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच रात्री दिशासोबत बोलणे झाले होते. त्यादरम्यान, ती तणावात असल्याने तिला समजावले. पण मध्यरात्री तिने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. यादरम्यान मालवणी पोलिसांनी तपास केला. तसेच, आमचा कुणावरही संशय नसल्याचेही आम्ही सांगितले. तरी देखील १९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, दिशावर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली, असे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या विधानाला नितेश राणे यांनी दुजोरा देऊन समाज माध्यमांवर दिशाची प्रतिष्ठा व चारित्र्य हनन करणारी आहे. खोट्या व घाणेरड्या वक्तव्यामुळे मुलीची बदनामी होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या कलमांखाली गुन्हा दाखल
मालवणी पोलिसांनी कलम २११, ५००,५०४, ५०६ (२), ३४ सह ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.