मुंबई : मालवणीतील विषारी दारूने शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असतानाच मालाड पूर्वच्या कुरार परिसरात रविवारी सकाळी एका ३५वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा मृत्यू हा देशी दारू प्यायल्याने झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबाकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अंतिम शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा सध्या पोलीस करत आहेत.गणेश धोतरे असे या मयत इसमाचे नाव आहे. तो मूळचा पुण्याचा रहिवासी आहे. धोतरे आणि त्याची पत्नी हे मुंबईच्या मालाड मार्केटमधून कच्ची इमिटेशन ज्वेलरी विकत घेऊन ती आळंदीला विकून उदरनिर्वाह करत होते. रविवारी सकाळी कुरार परिसरात असलेल्या साईअमृत बारपासून काही अंतरावर धोतरे मूर्च्छित अवस्थेत सापडला. याबाबत दिंडोशी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत कोणतीही संशयित बाब नसून अंतिम शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
मालवणी दारूकांडाची पुनरावृत्ती?
By admin | Published: August 10, 2015 1:41 AM