मामासाहेबांच्या जाण्याने ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 07:51 PM2018-01-03T19:51:36+5:302018-01-03T19:52:01+5:30
विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षविरहित भूमिका घेत अनेकांना प्रेरणा देणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव उपाख्य मामासाहेब किंमतकर यांच्या निधनाने आपण एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई : विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षविरहित भूमिका घेत अनेकांना प्रेरणा देणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव उपाख्य मामासाहेब किंमतकर यांच्या निधनाने आपण एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नेहमीच सक्रीय कार्यकर्त्याच्या भूमिकेतून जबाबदारी सांभाळणाऱ्या माजी मंत्री मामासाहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले. शिक्षक आणि वकील म्हणून सेवा देणाऱ्या मामासाहेबांनी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यासोबत काम करताना कामगार चळवळीपुरतीच आपली वकिली मर्यादित ठेवून एक आदर्श निर्माण केला. रामटेक भागातून आमदार झाल्यानंतर आदिवासी शेतकऱ्यांना सिंचन सुविधा देण्याचा ध्यास घेऊन सुरू केलेला सिंचन संघर्ष त्यांनी अखेरपर्यंत सुरू ठेवला. विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांच्या एकजुटीसाठी सतत आग्रही असणाऱ्या मामासाहेबांनी या प्रश्नावर अनेकांना एकत्र आणले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी नियोजनाच्या पातळीवर योगदान दिले. पाणी, सिंचन आणि अनुशेषाविषयी मार्गदर्शनासाठी अनेकजण हक्काने मामासाहेबांच्या घरी जायचे. त्यांच्याशी अतिशय जवळून आणि आपुलकीने संवाद साधण्याचा योग मला अनेकदा आला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील विदर्भासंदर्भात अतिशय पोटतिडकीने आणि हक्काने ते विविध विषय मांडत असत. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासाची आणि प्रश्नांची जाण असलेला एक जाणता नेता आपल्यातून गेला आहे, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्याच्या हितासाठी पोटतिडकीने लढणारा आदर्श लोकप्रतिनिधी गमावला - विद्यासागर राव
महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य आणि विदर्भ विकास मंडळाचे सदस्य अॅड. मधुकरराव किम्मतकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मधुकरराव किम्मतकर महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि लढ्वय्ये नेते होते. राज्याच्या आणि विशेषतः विदर्भाच्या प्रश्नांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते आयुष्यभर पोटतिडकीने झटले. विकासविषयक प्रश्न मांडताना त्यांनी कधीही पक्षीय अभिनिवेश बाळगला नाही. विदर्भ विकास मंडळाचे ते सर्वात जुने आणि अनुभवी तज्ज्ञ सदस्य होते. राज्याची नियोजन प्रक्रिया आणि अनुशेष प्रश्नांचा, विशेषतः जलसिंचन, रस्ते विकास विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास होता. विदर्भाच्या न्याय्य मागण्यांसाठी ते अनेकदा भेटत व भेटीनंतर सर्व स्तरावर आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करत. त्यांची बुद्धिमत्ता आणि समस्यांचे विश्लेषण करण्याची हातोटी विलक्षण होती. किम्मतकर यांनी सामान्य जनतेशी असलेली आपली नाळ आयुष्यभर जपली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने लोककल्याणाची कळकळ असलेला एक आदर्श अभ्यासू लोकप्रतिंनिधी गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.