मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून, अनेक नेतेमंडळींच्या त्या भेटीगाठी घेत आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये अनेकविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला लगावला.
तुम्ही काँग्रेसच्या विरोधात का लढत आहात, असा प्रश्न उपस्थितांपैकी एकाने विचारला. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आणि डावे पक्ष आमच्याविरोधात बंगालमध्ये लढले. त्यामुळे आता आम्हीही काँग्रेसविरोधात कंबर कसली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपल्याला हा लढा द्यावाच लागेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
महाराष्ट्रातही बस्तान बसवणार का?
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गोवा, मेघालय आणि त्रिपुरासारख्या राज्यांमध्ये प्रवेश केलेला आहे. आता ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्याने तृणमूल काँग्रेस आता महाराष्ट्रात प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हम महाराष्ट्र में नही आ रहै है, असे सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याच्या चर्चांना ममता बॅनर्जींनी पूर्णविराम दिला. टीएमसी महाराष्ट्रात सक्रिय होणार नाही. आम्ही महाराष्ट्रात येणार नाही. मात्र, जिथे प्रादेशिक पक्ष चांगले काम करत आहेत, भाजपसमोर ताकदीने उभे राहत आहेत, तेथे आम्ही जाणार नाही. तर जिथे भाजपला आव्हान देण्यासाठी प्रादेशिक पक्षांची ताकद तोकडी पडतेय, त्या ठिकाणी आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत. उलट, प्रादेशिक मित्रांनाच साथ देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
भाजपचा पराभव सहज शक्य आहे
या कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी राजकीय मुद्द्यांवर बोलताना भाजपच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगत भाजपविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे. देशात भाजपला पराभूत करायचे असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपला पराभूत करणे सहज शक्य आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, तुम्ही सातत्याने मैदानात उतरून भाजपसोबत लढत राहायला हवे. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील. पश्चिम बंगालमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाही मला बाहेर पडावे लागले. जेणेकरून इतरही प्रादेशिक पक्ष बाहेर पडतील आणि राजकारणात स्पर्धा तयार होईल, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.