Join us

ममता बॅनर्जींचा ‘जय मराठा, जय बांग्ला’चा नारा, सिद्धिविनायक मंदिरात घेतले दर्शन; मुख्यमंत्री ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 6:54 AM

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्या. सर्वप्रथम त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना ‘जय मराठा, जय बांगला’, असा नारा देत सर्वांना आश्चर्यचकीत केले

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्या. सर्वप्रथम त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना ‘जय मराठा, जय बांगला’, असा नारा देत सर्वांना आश्चर्यचकीत केले. हा नवा नारा भाजपविरोधी राष्ट्रीय राजकारणातील आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

सिद्धिविनायक दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. त्यांच्यासाठी प्रार्थना केली. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. त्यासाठी मी मंदिर समिती, ट्रस्टी आणि पुजारी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानते. मला इथे येऊन बरे वाटले. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते, असे सांगत बॅनर्जी यांनी जय मराठा, जय बांगला हा नारा दिला. सिद्धिविनायक दर्शनानंतर बॅनर्जी यांनी शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली. रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याचे समजते. बुधवारी सकाळी ममता बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील तर सायंकाळी मुंबईतील बड्या उद्योजकांना भेटून त्यांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यातील बंगाल जागतिक व्यापार परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण देणार आहेत.

    संजय राऊत यांनी केले ट्विट-संजय राऊत यांनी दुपारीच ट्विटवरून बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली होती. ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. - त्यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती; पण आरोग्यासंबंधी काही बंधनांमुळे उद्धव ठाकरे यांची भेट होत नाही. -  अशावेळी मी आणि आदित्य ठाकरे संध्याकाळी साडेसात वाजता ममताजींना हॉटेल ड्रायडंट येथे भेटणार आहाेत, असे राऊत यांनी ट्विट केले होते.

टॅग्स :ममता बॅनर्जीमुंबईशिवसेना