ममता कुलकर्णीची अंधेरीतील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:32 AM2018-04-26T01:32:30+5:302018-04-26T01:32:30+5:30
या सदनिकांना सील ठोकून, त्याबाबत कोणताही व्यवहार न करण्याच्या सूचना पोलिसांनी संबंधित सोसायटीला द्याव्यात, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
राजू ओढे ।
ठाणे : अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने नुकतेच दिले. दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणामध्ये ती आरोपी आहे.
१३ एप्रिल २०१६ रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून १२ लाख रुपयांचे इफेड्रिन जप्त केले होते. या दोघांच्या चौकशीतून पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हादेखील या प्रकरणात आरोपी आहेत. ठावठिकाणा मिळत नसल्याने न्यायालयाने ममताला फरार घोषित केले होते. त्यानंतर, पोलिसांनी अंधेरीच्या निवासस्थानी नोटीस बजावली. मात्र, त्यानंतरही दोघांनी न्यायालयासमोर हजेरी लावली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिची मालमत्ता जप्तीची परवानगी न्यायालयास मागितली होती. नोव्हेंबर २०१७ मध्येही ममताच्या मालमत्तेच्या जप्तीचा मुद्दा न्यायालयासमोर आला होता, परंतु तांत्रिक कारणांमुळे तो रखडला होता. १७ एप्रिल रोजी अमली पदार्थविरोधी विशेष न्यायालयाचे न्या. एच.एम. पटवर्धन यांच्यापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. मालमत्तेच्या जप्तीसारखा कठोर निर्णय घेण्यापूर्वी आरोपींना पुरेसा अवधी देण्यात आला असल्याचे निरीक्षण नोंदविले. सरकारची बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.
ममता मुकुंद कुलकर्णीच्या नावे अंधेरीतील वर्सोवा मार्ग क्रमांक ५ वर स्काय एन्क्लेव्ह सोसायटीत डी ब्लॉकमध्ये पहिल्या, दुसºया आणि सातव्या माळ्यावरतीन प्रशस्त सदनिका आहेत. या सदनिकांना सील ठोकून, त्याबाबत कोणताही व्यवहार न करण्याच्या सूचना पोलिसांनी संबंधित सोसायटीला द्याव्यात, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.