Video : आयुष्य संपवण्यासाठी 'तो' रेल्वे रुळांवर झोपला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 06:12 PM2018-07-31T18:12:53+5:302018-07-31T18:18:37+5:30
कुर्ला स्थानकातील धक्कादायक प्रकार
मुंबई कुर्ला रेल्वे स्थानकात दुपारी दीड वाजता एक माणूस प्लॅटफॉर्मवरुन उतरला आणि शांतपणे रेल्वे रुळांवर जाऊन झोपला. त्याच्या या कृतीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. काहीजणांनी हे दृष्य पाहून आरडाओरड केली, तर काहीजणांना आता पुढे काय होणार, असा प्रश्न सतावू लागला. तितक्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या एका कर्मचाऱ्यानं रेल्वे रुळांवर उडी घेतली. यानंतर काही उपस्थित प्रवाशीदेखील रेल्वे रुळांवर उतरले. त्यांनी त्या प्रवाशाला रुळांवरुन बाजूला करण्यास सुरुवात केली आणि मोठा अनर्थ टळला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यासह उपस्थितांनी रेल्वे रुळांवर धाव घेतल्यानं प्रवाशाचा जीव वाचला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या प्रवाशाचं नाव नरेंद्र दामाजी कोटेकर असल्याची माहिती मिळत आहे. कौटुंबिक समस्यांना कंटाळून कोटेकर आत्महत्या करण्यासाठी कुर्ला स्थानकात आले होते, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती पोलिसांनी कोटेकर यांच्या कुटुंबाला दिली. त्यानंतर त्यांना समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं.
#WATCH: A man was saved by Railway Protection Force (RPF) personnel & other passengers after he attempted to commit suicide at #Mumbai's Kurla railway station. (30.07.2018) (Source: CCTV) pic.twitter.com/6Yz5WB2Tsw
— ANI (@ANI) July 30, 2018
काही दिवसांपूर्वी पनवेलमध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळी ट्रेनमध्ये चढणारा एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला. ट्रेननं वेग घेतल्यानं हा प्रवासी ट्रेनसोबत ओढला गेला. हा प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये असणाऱ्या पोकळीत खेचला जात होता. तितक्यात प्लॅटफॉर्मवरील रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यानं त्याला मागे खेचलं. यानंतर प्लॅटफॉर्मवरील काही प्रवासीदेखील त्याच्या मदतीला धावले आणि प्रवाशाचा जीव वाचला.