Join us

ब्रिटनहून आलेल्या एकास नव्या कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:08 AM

ठाणे : युरोपीयन देशांतून आलेल्या एकूण २३५ नागरिकांपैकी केवळ एकाला कोरोनाच्या नव्या संसर्गाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने ...

ठाणे : युरोपीयन देशांतून आलेल्या एकूण २३५ नागरिकांपैकी केवळ एकाला कोरोनाच्या नव्या संसर्गाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२ नागरिकांचा शोध लागला नसल्याने महापालिकेची चिंता वाढली होती. पालिकेने शोधमोहीम तीव्र करून अखेर त्यांना गाठल्याने यंत्रणेने सुस्कारा सोडला.

ब्रिटन आणि युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर आता संपूर्ण देशात अशा युरोपीयन देशांमधून आलेल्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. २० नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत आलेल्यांचा शोध सध्या सुरू आहे. त्यानुसार ठाण्यात अशा देशांतून तब्बल २३५ नागरिक आतापर्यंत आले असून, त्यांचा पाच दिवसांपासून शोध सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. यातील २२३ नागरिकांचा शोध घेण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले होते. मात्र १२ नागरिकांचा शोध घेणे कठीण होऊन बसले होते. अखेरीस शोधमोहीम तीव्र करून पालिकेने बुधवारी त्यांना शोधून काढले. त्यापैकी एकाला कोरोनाच्या नव्या संसर्गाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. परंतु, त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर घरीच उपचार सुरू असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.