मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मनोरुग्ण चाकू घेऊन शिरल्याने गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 03:30 PM2018-03-08T15:30:08+5:302018-03-08T15:32:48+5:30
पोलीस त्याला पकडायला डब्यात शिरले तेव्हा हा मनोरुग्ण कांदिवली स्थानकावरील पादचारी पूलाच्या बाहेरच्या बाजूला लोंबकळत राहिला.
मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावर गुरुवारी दुपारी एक मनोरुग्ण लोकलच्या डब्यात शिरल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. मात्र, पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला हा मनोरुग्ण लोकलमधील महिलांच्या डब्यात शिरला होता. त्याच्या हातात चाकू असल्याने अनेक महिला घाबरल्या. मालाड ते कांदिवली या स्थानकांदरम्यान तो महिलांच्या डब्यात होता. ट्रेन कांदिवली स्थानकावर थांबल्यानंतर रेल्वे पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. पोलीस त्याला पकडायला डब्यात शिरले तेव्हा हा मनोरुग्ण कांदिवली स्थानकावरील पादचारी पूलाच्या बाहेरच्या बाजूला लोंबकळत राहिला. या पूलाच्या खाली ओव्हरहेड वायर असल्याने रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी त्याला खाली आणण्यासाठी तब्बल दोन तास प्रयत्न करत होते. अखेर हा मनोरुग्ण पूलावरून खाली पडल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.