ठाणे- जगभरातील आयफोन प्रेमींचं आकर्षण असणारा आयफोन X अखेरीस बाजारात दाखल झाला. आयफोन X विकत घेणं हे प्रत्येकासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे. ठाण्यातील एका तरूणाचं हा नवा मोबाइल घेण्याचं स्वप्न साकार झालं. ठाण्यातील नौपाडा भागात राहणारा हा मुलगा चांगलाच चर्चेत आहे. आयफोन खरेदीचा आनंद त्या तरूणाने एकदम हटके स्टाइलने साजरा केला.
महेश पालीवाल हा २० वर्षांचा तरुण आयफोन वेडा, असं म्हणायला हरकत नाही. महेश हा आयफोनशिवाय दुसरा फोनच वापरत नाही. तो जेव्हा स्वतः कमावत नव्हता, तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी काटकसर करून पैसे जमवून त्याला आयफोन घेऊन दिला. आयफोनसाठी महेशनंही आपल्या अनेक मागण्या कमी केल्या होत्या. आता महेश स्वतः कमावतो आहे. त्यामुळे ज्या दिवशी आयफोन X लॉन्च झाला, त्याच दिवशी तो विकत घेण्याचा निर्धार त्यानं केला आणि पैशांची जमवाजमव करून ऑर्डरही दिली.
आपला आयफोन X ठाण्यात दाखल झाल्याचं कळताच, महेशनं बॅण्डबाजा आणि घोडा बोलावून घेतला. शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता महेशची ही वरात आयफोन स्टोअरच्या दिशेनं निघाली. त्याच्या हातात 'आय लव्ह आयफोन X'चा बॅनर पाहून सगळ्यांच्याच आश्चर्य वाटलं. घोड्यावर बसून वाजत-गाजत तो आयफोनची डिलिव्हरी घ्यायला निघाला. महेशच्या या हटके स्टाइलने सगळ्यांनाच धक्का बसला. पण महेशने मात्र त्याचं हे हटके सेलिब्रेशन चांगलंच एन्जॉय केलं.
आयफोन X ची सध्या बाजारात चांगलीच क्रेझ आहे. आयफोन X चा उच्चार आयफोन दहा असा आहे. आयफोन दहाची किंमत 89 हजारापासून ते एक लाख दोन हजार रूपये इतकी आहे.