सी लिंकवरून मारली उडी, मृतदेह मढच्या खडकात; कानातील रिंग, टॅटूमुळे पटली ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 02:16 PM2023-09-27T14:16:08+5:302023-09-27T14:16:52+5:30
वरळी सी लिंकवरून उडी घेतलेल्या चालक विनय यादव याचा मृतदेह मढच्या खडकात मिळाला आहे.
मुंबई :
वरळी सी लिंकवरून उडी घेतलेल्या चालक विनय यादव याचा मृतदेह मढच्या खडकात मिळाला आहे. कानातली रिंग आणि हातावरील टॅटूमुळे मृतदेहाची ओळख पटली असून, वरळी पोलिस अधिक तपास करत आहे.
यादव हे जोगेश्वरीतील रहिवासी असून, खासगी चालक म्हणून काम करतात. बुधवारी रात्री कुटुंबासोबत जेवण उरकून रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी घर सोडले. गुरुवारी सकाळी चारच्या सुमारास एक इनोव्हा कार वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आली. या कारच्या चालकाने कार पुलाच्या कडेला उभी करुन कारमधून उतरत थेट समुद्रात उडी घेतली. हा प्रकार येथील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती स्थानिक वरळी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार ताब्यात घेऊन तपास सुरु केला. अग्निशमन दल, नाैदल आणि भारतीय तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या मदतीने गुरुवारी सकाळपासून यादव याचा शोध सुरू होता.
अखेर सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास मढ येथील बारी खडक परिसरात मृतदेह आढळून आला.
रिंग आणि हातावरील टॅटूने मृतदेहाची ओळख पटली आहे. वरळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
चालकाच्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम
चालकाने आत्महत्या का केली, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मित्रमंडळींकडे अधिक चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्या मोबाइलद्वारे अधिक तपास सुरू असल्याचे वरळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी सांगितले.