मुंबई- घरी मांजर आणल्यामुळे आई व मुलाचं कडाक्याचं भांडण झाल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. हे भांडण इतकं टोकाला गेलं की मुलाने पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मौलविक सौदाळकर हा 22 वर्षीय मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे.
मंगळवारी (ता. 1 मे) मौलविकने एक पर्शियन जातीची मांजर 6 हजार रुपयांना विकत घेतली. त्या मांजरीला घेऊन तो चिरा बाजार येथिल त्याच्या घरी गेला. मौलविकच्या आईला घरात प्राणी पाळायला आवडत नाहीत. म्हणून मांजर घरी आणायला त्यांचा विरोध होता. त्यावरून मौलविक व त्याच्या आईमध्ये वाद झाला. या वादामुळे रागाच्याभरात मौलविकने मरीन लाइन्स स्थानकाजवळील मेघदूत पुलावरून उडी मारली. पुलावरून उडी मारल्याने मौलविक गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. तसंच डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत.
मौलविकच्या या कृत्यामुळे त्याची आई आता घरी मांजर ठेवायला तयार झाली आहे. मुलगा लवकर बरा व्हावा, यासाठी मैलविकची आई काही नातेवाईक व त्या मांजरीसह हॉस्पिटलमध्ये बसली आहे. मौलविक शुद्धीवर आल्यावर आपण मांजर घरात ठेवायला तयार असल्याचं त्याला सांगायचं आहे, असं भावनिक मत त्याच्या आईने व्यक्त केलं आहे.
दरम्यान, मौलविक रागात बाईकवरून गेला व त्याच्या बाईकला अपघात होऊन तो पडला, अशी माहिती त्याच्या चुलत भावाने दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मौलविक रागात बाईकवरून घरातून निघाला. त्यानंतर मेघदूत पुलावर त्याने गाडी पार्क केली व पुलावरून उडी मारली. 25 फुटांवरून त्याने उडी मारली आहे, असं पोलिसांनी म्हटलं.