खाकीतला माणूस दिसणार खादीत; प्रदीप शर्मा आज करणार शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 01:53 PM2019-09-13T13:53:06+5:302019-09-13T13:58:06+5:30
नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई - एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी खास ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी दोन महिन्यांपूर्वी दिलेला राजीनामा राज्याच्या गृह विभागाने मंजूर केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांचा राजकारणात जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला. आज सायंकाळी शर्मा शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर प्रदीप शर्मा राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता राज्याच्या गृह विभागाने राजीनामा मंजूर केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर प्रदीप शर्मा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या वसई-विरार भागातील ठाकूर कुटुंबाची असलेली एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदार संघातून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. दरम्यान, १९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहीम ही दोन पोलीस स्टेशन वगळता आपला बहुसंख्य काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. २००८ मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट २०१७ मध्ये पुन्हा ते पोलीस सेवेत परतले होते. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते.
पोलीस दलात सर्वाधिक एन्काऊंटर करण्याची कामगिरी प्रदीप शर्मा यांच्याच नावावर नोंद आहे. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे. इतकी उत्तम कामगिरी केलेले प्रदीप शर्मा राजकारण किती गाजवणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.