‘मन की बात’ झाली उघड

By admin | Published: August 8, 2015 02:00 AM2015-08-08T02:00:17+5:302015-08-08T02:00:17+5:30

पोलीस ठाणे अथवा एखाद्या शाखेत कार्यरत असलेल्या प्रभारी अधिकाऱ्याला आपल्या ठिकाणाची माहिती (लोकेशन) दिवसातून किमान दोन वेळा कंट्रोल रूमला द्यावी लागते.

'Man Ki Baat' happened | ‘मन की बात’ झाली उघड

‘मन की बात’ झाली उघड

Next

जमीर काझी, मुंबई
पोलीस ठाणे अथवा एखाद्या शाखेत कार्यरत असलेल्या प्रभारी अधिकाऱ्याला आपल्या ठिकाणाची माहिती (लोकेशन) दिवसातून किमान दोन वेळा कंट्रोल रूमला द्यावी लागते. ती दिल्यानंतरही नजरचुकीने वॉकीटॉकीचे संपर्क साधण्याचे बटण सुरूच राहिल आणि एका अधिकाऱ्यावर आफत ओढावली. यातूनच वरिष्ठांच्या कार्यपद्धतीची ‘मन की बात’ सर्वांपर्यंत पोहोचली, कोण अधिकारी कोठून आणि कसे हप्ते घेतो, याची सविस्तर माहिती नियंत्रण कक्षाला समजली.
या ‘गोपनीय’ माहितीमुळे या अधिकाऱ्याची साहेबांकडून चांगलीच ‘चंपी’ झाली. त्याचबरोबर प्रभारीपदही गमावण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या पश्चिम विभागातील बोरीवली चौकीतील अधिकाऱ्याबाबत हा प्रकार घडला. सुमारे सव्वा, दीड महिन्यापूर्वी त्याची येथे नियुक्ती झाली आहे. मात्र त्यांच्या हद्दीतील वाहतुकीचे नियोजन अद्याप योग्य पद्धतीने झालेले नसल्याचा ठपका वरिष्ठ त्यांच्यावर वारंवार ठेवत होते. बुधवारी सकाळी गाडीत बसल्यानंतर थोड्याच वेळात वाहतूक शाखेच्या मुख्य नियंत्रण कक्षातून कॉल आला, त्यांनी वॉकीटॉकीवरून लोकेशन सांगितले. मात्र त्यानंतर ‘व्हॉईस’ बटण बंद करण्यास ते विसरले. चालकाशी बोलताना प्रामाणिकपणाचा आव आणणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी कसे पैसे खातात? हप्ता गोळा करण्यासाठी कशी आपली माणसे नेमतात? जिकडे बदली होईल, तिकडे आपल्या सोबत त्यांना कसे घेऊन जातात? याची रसभरीत वर्णने ते चालकाशी बोलताना करू लागले. मुख्य नियंत्रण कक्षाबरोबरच दक्षिण आणि उत्तर नियंत्रण कक्षातील आॅपरेटर आणि अन्य कर्मचारी ही वर्णने ऐकून काहीवेळ चक्रावून गेले होते. एकाने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला; आणि त्यांनी तातडीने वॉकीटॉकीचे बटण बंद केले.
तोपर्यंत उशीर झालेला होता. वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचलेली होती. विभागाचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्यांना दुपारी दीड वाजता कार्यालयात येऊन भेटण्याची सूचना दिली. त्यानुसार संबंधित अधिकारी वरळीतील कार्यालयात येऊन पहिल्यांदा त्यांनी वाचक (रीडर) बधे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर साहेबांची भेट घेतली. तेव्हा त्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आल्याचे समजते.

Web Title: 'Man Ki Baat' happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.