कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 04:31 PM2018-07-30T16:31:54+5:302018-07-30T16:35:13+5:30
अर्धायु इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो सापडला
मुंबई - कॅन्सरवरील उपचारासाठी घरफोड्या करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सलीम शेख असं या आरोपीचं नाव असून त्यानं दादरमधील तब्बल 22 घरांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. सलीम शेख उस्मानाबादचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. तो कर्करोगग्रस्त आहे. त्यानं केलेल्या चोऱ्यांमुळे पोलिसांनादेखील धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वीच सलीम शेखनं अर्धायु इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये चोरी केली होती. या ठिकाणाहून त्यानं 11 लाख रुपये लांबवले. मात्र ही सलीम शेखची शेवटची चोरी ठरली. कारण अर्धायु इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो सापडला. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी सलीमची संपूर्ण माहिती मिळवली आणि त्याच्या उस्मानाबादमधील पत्नीशी संपर्क साधला. पोलिसांनी सलीमच्या पत्नीची चौकशी केली. यातून सलीम मुंबईत कुठे लपू शकतो, याची माहिती पोलिसांना मिळाली.
पत्नीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी सलीमला अटक केली. आपली आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याचं सलीमनं पोलीस चौकशीत सांगितलं. तो कर्करोगग्रस्त असल्याची माहितीदेखील त्यानं पोलिसांना दिली. कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी चोऱ्या केल्याचं सलीमनं पोलिसांना सांगितलं.