मुंबईतील असाही कोविडयोद्धा! रिक्षावाला जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना देतोय मोफत सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:00 PM2021-05-11T18:00:32+5:302021-05-11T18:01:27+5:30

मुंबईतील एक रिक्षाचालक कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरत आहे.

Man provides free auto rides in mumbai to patients and the needy | मुंबईतील असाही कोविडयोद्धा! रिक्षावाला जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना देतोय मोफत सेवा

मुंबईतील असाही कोविडयोद्धा! रिक्षावाला जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना देतोय मोफत सेवा

googlenewsNext

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे बोधवाक्य आता केवळ आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीचं मर्यादित राहिलेलं नाही. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था, पोलीस यंत्रणा तर जीवाची पर्वा न करता झोकून देऊन काम करत आहेच. पण त्यांच्यासोबत असेही काही युवा आहेत की जे समाजाप्रतीची जाणीव जपून या कठीण काळात सर्वांची मदत करत आहेत. 

मुंबईतील असाच एक रिक्षाचालक कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरत आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. राज्य सरकारनंही यावेळीच्या लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांची दखल घेत मदत जाहीर केली असली तरी दैनंदिन गोष्टींची गरज भागवताना रिक्षा चालकांना पोटाला चिमटा काढूनच जगावं लागत आहे. अशात मुंबईच्या घाटकोपर येथील दत्तात्रय सावंत नावाचा एक मराठमोळा रिक्षाचालक सर्वांसाठी आदर्श ठरत आहे. (Man provides free auto rides in mumbai to patients and the needy)

कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्स वेळेत मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर दत्तात्रय यांनी रुग्णांना मोफत रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचं काम हाती घेतलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीवाचा धोका पत्करुन दत्तात्रय सावंत पीपीई कीट परिधान करुन कोरोना रुग्णांना रिक्षात बसवून रुग्णालयात नेण्याचं काम करत आहेत. 

विशेष म्हणजे दत्तात्रत सावंत यांचं बीएडपर्यंतचं शिक्षण झालेले असून ते २००० साली मुंबईत आले होते. एका शाळेत ते शिक्षक म्हणून काम करतात. शाळेचं काम संपल्यानंतर ते रिक्षा चालवयाचे. सध्या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्यानं ते पूर्णवेळ रिक्षा चालवत आहेत आणि यातही ते कोरोना रुग्णांना मोफत सेवा देत आहेत. 

"मी घाटकोपरमधील ज्ञानेश्वर विद्यामंदीर शाळेत इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. तीन वर्षांपूर्वी कर्ज काढून रिक्षा खरेदी केली आणि शाळेचं काम झाल्यानंतर रिक्षा चालवतो", असं दत्तात्रय सावंत यांनी 'इंडिया टुडे'ला सांगितलं.

कोरोना काळात रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत रिक्षानं प्रवासाची सेवा दत्तात्रय सावंत देतात. यासोबतच आता ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर पोहोचविण्याचं कामही त्यांनी सुरू केलं आहे. जास्तीत जास्त लोकांना या कठीण काळात मदत करण्याचं उद्दीष्ट असल्याचं सावंत अभिमानानं सांगतात. 

"मी घाटकोपरच्या एका झोपडपट्टीत राहातो. अनेक जण अतिशय हलाकीच्या परिस्थितीत इथं राहतात. यात रोजंदारीवर पोट असणाऱ्यांची संख्या खूप आहे. आधीच लॉकडाऊनमुळे पोटाळा खळगी त्यात कोरोनाची लागण झाली तर हे लोक पैसे कुठून आणणार? यामुळे त्यांना रुग्णालयात पोहोचवणं फार गरजेचं असतं आणि तेच मी करतो. त्यांच्यासाठी माझ्या खिशातून पैसे गेले तरी चालतील पण माणूस वाचणं फार महत्वाचं आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे मी माझ्या रिक्षावरही लिहिलंय", असं दत्तात्रय सावंत यांनी सांगितलं. 
 

Web Title: Man provides free auto rides in mumbai to patients and the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.