फोनवर मोठ्याने बोलला म्हणून बिल्डिंगवरुन खाली ढकललं, मुंबईतील धक्कादायक घटना, जागीच मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:21 IST2025-04-23T18:20:38+5:302025-04-23T18:21:56+5:30
फोनवर मोठ्याने बोलण्याचा आणि चापट मारल्याचा राग मनात धरुन एका सुताराने त्याच्या सहकाऱ्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

फोनवर मोठ्याने बोलला म्हणून बिल्डिंगवरुन खाली ढकललं, मुंबईतील धक्कादायक घटना, जागीच मृत्यू!
फोनवर मोठ्याने बोलण्याचा आणि चापट मारल्याचा राग मनात धरुन एका सुताराने त्याच्या सहकाऱ्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी अफसर जमीर उद्दीन आलम (२५) याला अटक केली आहे.
कांदिवली पश्चिमेकडील भाटिया स्कूल समोर असलेल्या दैवी इंटरनीटी पी २ या ठिकाणी २० एप्रिल रोजी ही घटना घडली. तक्रारदार मनोज चौहान (२८) हे ती महिन्यांपासून याच इमारतीमध्ये सुतार कामाकरिता राहत आहेत. तेथे जितेंद्र चौहान (३०) आणि अफसर यांच्यासह १० ते १२ जण एकत्र काम करत होते. २० एप्रिलला रात्री मनोज, सत्येंद्र बहादूर आणि अफसर मोबाइलवर मॅच बघत होते. काही वेळाने जितेंद्र तेथे फोनवर बोलत आला. तेव्हा अफसरने जितेंद्रला 'क्यू चिल्ला रहा है, आराम से बात कर ना', असे म्हटले. तेव्हा जितेंद्रने त्याला 'तू क्या बॉसगिरी दिखा रहा है क्या', असे म्हणत चापट मारली. त्यावरुन दोघांत मारामारी झाली. मनोज व सत्येंद्र यांनी त्यांना रोखले. मात्र, नंतर जितेंद्र दुसऱ्या मजल्यावर उभा असताना अफसरने त्याला खाली ढकलले.
रुग्णालयात दाखल केले, पण...
जितेंद्र दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्त येऊ लागले. सहकार्यांनी तातडीने त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र काही तासांनी जितेंद्रचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करत अफसरला अटक केली आहे.