बलात्कारासह हत्येप्रकरणी तरुणाला फाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 06:08 AM2019-10-05T06:08:12+5:302019-10-05T06:08:38+5:30
एका २४ वर्षीय फिजिओथेरपिस्टवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने २९ वर्षीय तरुणाला शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठाविली.
मुंबई : एका २४ वर्षीय फिजिओथेरपिस्टवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने २९ वर्षीय तरुणाला शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठाविली.
२४ सप्टेंबर रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांनी आरोपी देबाशिष धरा याला हत्या, बलात्कार, अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार करणे आणि पीडितेच्या घरात घुसणे, अशा गुन्ह्यांखाली दोषी ठरविले. शुक्रवारी त्याला फाशीची शिक्षा ठोठाविली.
आपले कुटुंब गरीब असल्याने त्यांना आपली गरज आहे. त्यामुळे न्यायालयाने दया दाखवावी, अशी विनंती देबाशिषने न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला, तसेच न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत पुरेशी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
ही घटना डिसेंबर, २०१६ मध्ये घडली. पीडिता विलेपार्ले येथे राहत होती. तिच्या घराजवळील ज्वेलरी शॉपमध्ये आरोपी काम करत होता. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर, ५ व ६च्या मध्यरात्री देबाशिष फिजिओथेरपिस्टच्या घरात शिरला. त्याने तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार करून हत्या केली. पहाटे साडेतीनच्या सुमारास पीडितेच्या रुममधून धूर येऊ लागल्याने, शेजारी व तिचे वडील रूममध्ये गेले. तेव्हा पीडितेच्या अंगावर वस्त्र नव्हते. तिच्या गळ्याला जीन्स आवळल्या होत्या व तिच्या अंगावर पुस्तके ठेवून तिला जाळले होते.
फरार आरोपीला दोन महिन्यांनंतर त्याला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. १ आॅक्टोबर रोजी सरकारी वकिलांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. आरोपीला दया दाखवू नये. त्याच्या कृत्याचा पीडितेच्या कुटुंबावर काय परिणाम होईल, याचा विचार आरोपीने केला नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
मात्र, ‘आरोपीला कारागृहात सहकैदी मारहाण करतात, तो कुटुंबात एकटा कमावता आहे. तरुण असून पक्का गुन्हेगार नाही. फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी जग प्रयत्नशील आहे. आतापर्यंत १३८ देशांनी फाशीच्या शिक्षेची तरतूद रद्द केली आहे,’ असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
सरकारचा युक्तिवाद केला मान्य
‘आरोपीने निर्दोष व असाहाय्य मुलीवर अनैसर्गिक बलात्कार केला. तिचे शरीर निर्वस्त्र होते. त्याने स्त्रीत्वाचा अपमान केला. पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर पुस्तके टाकून ती जाळली. जेणेकरून पीडिता जळून खाक होईल व पुरावेही नष्ट होतील,’ असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद मान्य करत आरोपीला फाशीची शिक्षा ठोठाविली.