Join us  

अटल सेतूवर कार थांबवून थेट समुद्रात मारली उडी; CCTV मध्ये धक्कादायक प्रकार कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 3:21 PM

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरुन आणखी एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याची घटना सोमवारी घडली.

Atal Setu : अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अटल सेतूवर ४० वर्षीय व्यक्तीने कार थांबवून थेट समुद्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम सुरु केली आहे. अद्याप त्या व्यक्तीचा शोध लागलेला नसून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून उडी मारत पुण्याच्या एका बँकरने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता सोमवारी सकाळी आणखी एका व्यक्तीने अटल सेतूवरुन समुद्रात उडी घेतल्याने खळबळ उडाली आहे. अटल सेतूवर अनेकदा अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरु करण्यात आला असून त्याविषयी माहिती गोळा केली जात आहे.

सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दक्षिण प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षाला फोन आला होता. एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याची  पोलिसांना समजले. शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटल सेतूवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, दिवस पाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक सावर्डेकर, ठाणे अमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक साकोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अटल सेतूवरुन उडी मारणारी व्यक्ती लाल रंगाच्या ब्रेझा क्र. MH01DT9188 कारमधून आली होती. ती गाडी सुशांत चक्रवर्ती यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवडी पोलिसांच्या हद्दीत अटल सेतूवर ८.५ किमी अंतरावर ही गाडी थांबवली आणि त्यानंतर गाडीतील व्यक्तीने समुद्रात उडी मारली.  अटल सेतूवर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले. पोलिसांनी आणि बचाव पथकाने तात्काळ त्या व्यक्तीचा स्पीड बोटीच्या साहाय्याने शोध सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना माहिती दिली असून, पुढील तपास सुरू आहे. 

दरम्यान, यापूर्वी अटस सेतूवर दोन व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये एक अभियंता आणि एका बँकरचा समावेश आहे. 

टॅग्स :नवी मुंबईपोलिसमुंबई