मुंबई - एनएसजीला फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या काशीनाथ मंडल नावाच्या या तरुणाला डीबी मार्ग पोलिसांनी 27 जुलै रोजी अटक केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. या तरुणाने दिल्लीमधील एनएसजी नियंत्रण कक्षाचा फोन नंबर मिळवला होता. त्यानंतर त्याने शुक्रवारी एनएसजीला फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ल्याची धमकी दिली. एनएसजीला ज्या क्रमांकावरून फोन करण्यात आला होता तो क्रमांक मुंबईत ट्रेस करण्यात आला. त्यानंतर त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. अखेर पोलिसांनी झारखंड येथे राहणाऱ्या मंडल याचा शोध घेतला आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आली तेव्हा तो मुंबई सेंट्रल येथून सूरतला जाणाऱ्या ट्रेनमध्ये जाणार होता. झारखंडमधील रहिवासी असलेल्या काशीनाथचा एक मित्र नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात मारला गेला होता. त्यासंदर्भात काशीनाथ याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयात दाखल केले असता, त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ल्याची धमकी, तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 12:56 PM