Join us  

एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला अटक

By admin | Published: May 23, 2016 4:21 AM

फोर्ट परिसरातील एका हॉटेलच्या मॅनेजरला १ कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास कुटुंबातील सर्वांची हत्या करून हॉटेल बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या वाशिमच्या एका अभियांत्रिकी शाखेतील

मुंबई : फोर्ट परिसरातील एका हॉटेलच्या मॅनेजरला १ कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास कुटुंबातील सर्वांची हत्या करून हॉटेल बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या वाशिमच्या एका अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याला एम.आर.ए. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अमोल मनवर (वय २३) असे त्याचे नाव असून, एका वकिलालाही तो खंडणीसाठी धमकावित होता. पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने आपण हे कृत्य करीत असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील एका मोठ्या हॉटेलमधील मॅनेजरला खंडणीसाठी गेल्या महिन्याभरापासून धमकीचे वारंवार फोन येत होते. मात्र मॅनेजरने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आरोपी त्याच्या मोबाइलवर संदेश पाठवू लागला. त्यामुळे वैतागून त्यांनी १७ मे रोजी त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे धमकी येत असल्याची तक्रार रोहित शेट्टी या वकिलाने दिली. धमकीच्या स्वरूपात साधर्म्य असल्याने हे एकाच व्यक्तीचे कृत्य असल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला. ज्या मोबाइलवरून फोन व मेसेज पाठविण्यात येत होते, त्याची माहिती घेतली असता संबंधित नंबर वाशिममधील अमोल मनवर नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत तातडीने वाशिमच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून कळविण्यात आले. एमएआरए पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अमोलला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असल्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. आॅनलाइन नोकरी शोधत असताना संबंधित व्यक्तीचे मोबाइल नंबर मिळाल्याने खंडणीसाठी त्यांना कॉल केल्याची कबुली त्याने दिली. त्याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)