हवालदार हत्याप्रकरणी मुख्य हल्लेखोरावरील आरोप सिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 05:16 AM2020-02-29T05:16:18+5:302020-02-29T05:16:25+5:30
शिक्षेबाबत आज होणार सुनावणी
मुंबई : कर्तव्यावर असताना बांबूने हल्ला करत हत्या करण्यात आलेल्या पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या मुख्य हल्लेखोरावरील आरोप सिद्ध करण्यात तपास अधिकाऱ्यांना शुक्रवारी यश आले. शिक्षेची सुनावणी शनिवारी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अहमद अली मोहम्मद अली (२८) असे या मुख्य हल्लेखोराचे नाव आहे. खार पोलीस ठाण्यात २०१६ साली दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी करून अलीविरोधात भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर केले.
काय होते नेमके प्रकरण?
खार पश्चिमच्या मॅक्लॉइड पेट्रोल पंप परिसरात २३ आॅगस्ट, २०१६ रोजी अली याचा लहान अल्पवयीन भाऊ हेल्मेट न घालताच मोटारसायकल चालवत होता. कर्तव्यावर असलेल्या शिंदे यांनी त्याला अडवून कागदपत्रांची मागणी केली. मात्र ती नव्हती. त्यामुळे गाडी तिथेच सोडून त्याला पालकांना बोलावण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या मागे बसलेला त्याचा मोठा भाऊ अली याने शिंदेसोबत हुज्जत घालत बांबूने त्यांच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचा ३१ आॅगस्ट, २०१६ रोजी मृत्यू झाला होता.