विमानाने मुंबईत येत करायचा घरफोडी, पंधरा दिवसात पाच गुन्ह्यांची नोंद, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 06:45 IST2025-04-05T06:45:16+5:302025-04-05T06:45:30+5:30
Mumbai Crime News: उत्तर प्रदेशमधून विमानाने मुंबईत येऊन दिवसाढवळ्या बंद घरे फोडून किमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या गुन्हेगाराला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेश राजभर (३२) असे अटक आरोपीचे नाव असून त्याने गेल्या पंधरा दिवसांत मुंबई आणि नवी मुंबईतील चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

विमानाने मुंबईत येत करायचा घरफोडी, पंधरा दिवसात पाच गुन्ह्यांची नोंद, आरोपीला अटक
मुंबई - उत्तर प्रदेशमधून विमानाने मुंबईत येऊन दिवसाढवळ्या बंद घरे फोडून किमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या गुन्हेगाराला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेश राजभर (३२) असे अटक आरोपीचे नाव असून त्याने गेल्या पंधरा दिवसांत मुंबई आणि नवी मुंबईतील चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेकडील मॅरेथाॅन इमिनेन्स इमारतीमध्ये १७ मार्चला घुसलेल्या लुटारूने तब्बल सात लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिन्यांवर हात साफ केला. याप्रकरणी गुन्हा नोंदवत होताच मुलुंड पोलिस ठाण्याचे वपोनि अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) नितीन खाडगे व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सुनील करांडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिस तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने राजभर पर्यंत पोहोचले. त्यानुसार, पोलिसांनी राजभरचा माग काढत त्याला कळवा येथून ३० मार्चला ताब्यात घेत अटक केली. मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगड, लालगंजचा रहिवासी असलेला आरोपी राजभर हा १३ मार्चला विमानाने वाराणसीमधून मुंबईत आला होता.
२८ तोळे सोने जप्त
आरोपीकडून एकूण १४ लाख रुपये किमतीचे सुमारे २८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये किमतीचे दोन किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
डझनभर गुन्हे दाखल
राजभर विरोधात २०१४ पासून एकूण १२ गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी आहे.
मुंबई, नवी मुंबईसह डोंबिवली, कल्याण, वसई आणि पेण येथे चोरीचे गुन्हे नोंद असून पोलिस चौकशी करत आहे.
कळवा येथे चाळीत घर भाड्याने घेऊन राहू लागला
कळवा येथे चाळीमध्ये भाड्याने घर घेऊन तो राहू लागला. त्याने, कुर्ला पूर्व परिसरात रेकी करून १५ मार्चला नेहरूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहिली चोरी केली.
त्यानंतर, दोन दिवसांनी त्याने मुलुंडमध्ये घरफोडी केली. २० मार्चला त्याने भांडूपमध्ये चोरी करत आपला मोर्चा नवी मुंबईकडे वळवला. उलवे पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ आणि २७ मार्चला त्याने दोन चोऱ्या केल्याचे समोर आले.