Join us

प्लॅस्टिक पिशव्यांच्या विरोधात मनपा आक्रमक

By admin | Published: July 21, 2014 1:14 AM

निर्बंध असलेल्या कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापाराविरोधात महापालिकेने पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली आहे

नवी मुंबई : निर्बंध असलेल्या कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापाराविरोधात महापालिकेने पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या दोन्ही परिमंडळाने आपल्या अखत्यारीत असलेल्या वॉर्ड अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या असून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचे लवकर विघटन होत नाही. अशा पिशव्या पर्यावरणाला बाधा निर्माण करतात. तसेच पावसाळ्यात नाले व गटारात त्या अडकल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन आणि त्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर अशा पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात येते. महापालिकेच्या माध्यमातून अशा प्लॅस्टिक पिशव्यांच्या विरोधात नियमित मोहीम राबविली जाते. मात्र मागील तीन चार महिन्यांपासून ही मोहीम काही प्रमाणात थंडावली होती. यासंदर्भात लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन आणि वापरांवर कडक निर्बंध लावण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. (प्रतिनिधी)