Join us

लेखकांच्या मागण्यांसाठी 'मानाचि' शासन दरबारी; प्रतिनिधींनी घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

By संजय घावरे | Published: October 26, 2023 3:30 PM

यासाठी लेखक प्रतिनिधींच्या मंडळाने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

मुंबई - मालिका नाटक चित्रपट म्हणजेच मानाचि या लेखकांच्या संस्थेने आपल्या मागण्या शासन दरबारी सादर केल्या आहेत. यासाठी लेखक प्रतिनिधींच्या मंडळाने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

सरकारला दिलेल्या निवेदनामध्ये लेखकांच्या वेगवेगळ्या मागण्यांचा समावेश आहे. ज्यात लेखकाला आपल्या नाटकाचे किंवा चित्रपटाचे शीर्षक स्वतःच्या नावाने रजिस्टर करता यावे, कविता गीते व संवादातील विशिष्ट शब्दरचना मालिकेचे शीर्षक म्हणून वापरली गेली तर मूळ लेखकाला त्याचे उचित श्रेय व वन टाइम पेमेंट स्वरूपात मानधन मिळावे, चित्रपटाच्या दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि मुख्य कलाकारांप्रमाणेच लेखकाचेही, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) असल्याशिवाय चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट दिले जाऊ नये, या अस्तित्वात असलेल्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, कॉपीराईट रजिस्ट्रेशन दिल्लीप्रमाणेच मुंबईतही व्हावे, वृद्ध व विकलांग लेखकांसाठी पेन्शन योजना असावी व मानाचि लेखक संघटनेला त्यांच्या कार्यालयासाठी व त्यांचे विविध उपक्रम राबवण्यासाठी सरकारी आस्थापनात जागा मिळावी या प्रमुख मागण्या आहेत. 

या मुद्द्यांवर लेखकांच्या प्रतिनिधींची सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा झाली. मंत्र्यांनी यातील काही मुद्द्यांवर चित्रपट महामंडळ, चित्रनगरीचे संचालक व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून यथायोग्य मार्ग काढावा, असे सुचवले. त्याबाबत मानाचि लेखक संघटना आवश्यक ती पावले उचलणार आहे. लेखकांच्या वतीने विवेक आपटे, राजेश देशपांडे, श्याम पेठकर, राहुल वैद्य, श्रीकांत बोजेवार उपस्थित होते. 

टॅग्स :सुधीर मुनगंटीवार