Join us

मानाचि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी; शिवाजी मंदिरमध्ये रंगणार 'लेखक सन्मान संध्या'

By संजय घावरे | Published: May 04, 2024 6:55 PM

सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द पुरस्कार

मुंबई - मालिका, नाटक, चित्रपट लेखक संघटना म्हणजेच 'मानाचि'चा नववा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या निमित्ताने उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आणि लेखक सन्मान संध्या या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मानाचिचा नववा वर्धापन दिन सोहळा ६ मे रोजी दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. या निमित्ताने सकाळी ११ वाजता  संपन्न होणाऱ्या उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाच एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. यात संहिता क्रिएशन्सची 'चौदा इंचाचा वनवास', स्वामी नाट्यांगणची 'हू इज द कल्प्रिट', कलाघरची 'माझा पक्ष... पितृपक्ष', बीएमसीसीची 'अ टेल ऑफ टू' आणि अभिनय संस्थेची 'हि वाट दूर जाते' या एकांकिका सादर होणार आहेत. 

संध्याकाळी ७ वाजता लेखक सन्मान सोहळ्यामध्ये सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी २०२३ या वर्षात विविध माध्यमांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकांचा लेखकांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, चरित्रलेखिका वीणा गवाणकर, मालिका, नाटक, चित्रपटांचे लेखक, गीतकार, निर्माते, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :मुंबई